शॉपिंग सेंटरमधील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली
गुरेघर येथील घटना : 4 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास; परिसरात घबराट
गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील मॅप्रो गार्डन समोर असणार्या शॉपिंग सेंटरमधील पाच दुकानांचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानातील 4 हजार 200 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
पाचगणी : गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथील मॅप्रो गार्डन समोर असणार्या शॉपिंग सेंटरमधील पाच दुकानांचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानातील 4 हजार 200 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मॅप्रो गार्डन, गुरेघर (ता. महाबळेश्वर) येथे असलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये शनिवारी रात्री दोन-अडीचच्या सुमारास चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने पाच दुकानांची शटर कटावणीने उचकटली असून, आत दुकानामध्ये घुसून दुकानांच्या गल्ल्यातील 4 हजार 200 रुपयांची रोकड लांबवली आहे.
याबाबतची फिर्याद राहुल प्रकाश सणस (वय 43, रा. 245, गंगापुरी, वाई) यांनी पाचगणी पोलिसांत दिली आहे. त्यांचे गुरेघर ग्रामपंचायत शॉपिंग सेंटरमधील कस्तुरी लेडीज शॉपी व जयपुरी ड्रेसेस ही दुकाने भाड्याने घेतलेली आहेत. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून, ती घटना रविवारी सकाळी फिर्यादी दुकानदारांच्या निदर्शनास आल्याने त्यानी पांचगणी पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पाचगणीचे सपोनि सतीश पवार, पोलीस पीएसआय महामुलकर, पोलीस हवालदार शिवाजी पांबरे, सूरज गवळे यांनी घटनास्थळी तत्काळ दाखल होत सविस्तर माहिती घेतली.
यामध्ये जयपुरी ड्रेसेस 1150 व कस्तुरी लेडीज शॉपी मधून 500, तसेच संतोष विठोबा बर्गे यांच्या ज्ञानेश्वरी हॉटेलमधील रोख रुपये 50 व स्नेहल तेजस उंबरकर यांच्या दुकानातील 2500 रुपये असे मिळून 4200 रुपये चोरट्यांनी चोरून नेले. सदरिल पाच दुकानांची शटर चोरट्यांनी उचकटली आहेत.
त्याअगोदर दुकानाच्या बाहेर असणार्या सीसीटीव्हीची मोडतोड करण्यात आली असून, शटर उचकटून दुकानामध्ये प्रवेश करीत गल्ल्यातील 4200 रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे.
या घटनेचा पुढील तपास सपोनि सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिवाजी पांबरे करीत आहेत.