sports

सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारा शिक्षक हाच देशाचा खरा आधारस्तंभ

विश्‍वंबर बाबर; क्रांतिवीर संकुलात ऑनलाइन पद्धतीने शिक्षक दिन साजरा 

‘सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारा शिक्षक हाच देशाचा खरा आधारस्तंभ आहे. ज्ञान मंदिरातील काळ्या फळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात रंगभरणी करण्याचे काम शिक्षक करीत असतो. एक शिक्षक ते देशाचे राष्ट्रपती हा खडतर प्रवास आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे मत विश्‍वंबर बाबर यांनी व्यक्त केले.

वरकुटे : ‘सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारा शिक्षक हाच देशाचा खरा आधारस्तंभ आहे. ज्ञान मंदिरातील काळ्या फळ्याच्या माध्यमातून विद्यार्थी जीवनात रंगभरणी करण्याचे काम शिक्षक करीत असतो. एक शिक्षक ते देशाचे राष्ट्रपती हा खडतर प्रवास आपण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,’ असे मत विश्‍वंबर बाबर यांनी व्यक्त केले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त   क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात ऑनलाइन शिक्षक दिनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष प्रा. विश्‍वंभर बाबर यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना महामारीमुळे सध्या शाळा बंद आहेत. मात्र, शासन नियमाप्रमाणे काही प्रमाणात शिक्षकांची शाळेत उपस्थिती आहे. 

समाजातील शिक्षकांचे महत्त्व, सध्याची कोरोना महामारी व त्यातच विद्यार्थ्यांविना शिक्षक दिनाचे आयोजन याची माहिती देताना मुख्याध्यापिका सुलोचना बाबर भावनाविवश झाल्या. बागडणार्‍या विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीत केवळ चार भिंतींना साक्ष ठेवून शिक्षक दिन साजरा करावा लागत आहे, असे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.

यावेळी प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनविषयक पैलूंची माहिती दिली. 
या कार्यक्रमास मुख्याध्यापक अनिल माने, सुभद्रा पिसे तसेच संकुलातील शिक्षक उपस्थित होते. विशेष म्हणजे शाळेतील सर्व वर्गनिहाय विद्यार्थी ऑनलाइन गटाच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी झाले होते. 

साधना दुधाळ यांनी सूत्रसंचालन केले. तुकाराम घाडगे यांनी आभार मानले.