sports

वरकुटे-मलवडीच्या विकासाला नवी दिशा देणार

सुवर्णाताई देसाई यांचे प्रतिपादन : वरकुटे-मलवडीत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भूमिपूजन

‘एकीकडे कोरोना संकटाशी मुकाबला सुरू असतानाच दुसरीकडे विकासकामे पूर्ण करून जनसुविधांत भर घालण्याचे आव्हान समोर आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबरोबरच पायाभूत सुविधा आणि इतर अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचा परिसर असलेल्या वरकुटे-मलवडीच्या विकासाला नवी दिशा देणार आहे,’ असे प्रतिपादन कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुवर्णाताई देसाई यांनी केले.

वरकुटे-मलवडी : ‘एकीकडे कोरोना संकटाशी मुकाबला सुरू असतानाच दुसरीकडे विकासकामे पूर्ण करून जनसुविधांत भर घालण्याचे आव्हान समोर आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबरोबरच पायाभूत सुविधा आणि इतर अत्यावश्यक कामे पूर्ण करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचा परिसर असलेल्या वरकुटे-मलवडीच्या विकासाला नवी दिशा देणार आहे,’ असे प्रतिपादन कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सुवर्णाताई देसाई यांनी केले.

वरकुटे-मलवडी, ता. माण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे व श्रीनाथ मंदिरासमोर पेवर ब्लॉक बसवण्याच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी ग्रामपंचायत वरकुटे-मलवडी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

या वेळी देसाई उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अरुण देसाई, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, सरपंच बाळकृष्ण जगताप जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, माजी सरपंच बाबासाहेब नरळे, जालिंदर खरात, भारत अनुसे, मल्हारी जगताप, अभय जगताप, सचिन होनमाने, डॉ. कोडलकर, डॉ. आनंदराव खरात, विक्रम शिंगाडे, धीरज जगताप, साहेबराव खरात, सुनील थोरात, अरुण वणवे, काशिनाथ आटपाडकर, कॉन्ट्रॅक्टर इंगळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देसाई म्हणाल्या, ‘वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील नागरिकांची संख्या पंचवीस हजाराच्यावर आहे. प्रामुख्याने यामध्ये कष्टकरी, कामगार, ऊसतोडमजूर आणि सर्वसामान्यांची संख्या जास्त आहे. परिसरात हमखास रोजगाराचे साधन नसल्याने, कमी पैशात खासगी दवाखान्यात उपचार घेणे जिकिरीचे बनले आहे. बनगरवाडी, महाबळेश्‍वरवाडी, शेनवडी, कुरणेवाडी, जांभुळणी, काळचौंडी, विरळी, वळई, पानवण या ग्रामीण भागात चांगल्या डॉक्टरांचा अभाव असल्याने, येथील नागरिकांच्या आरोग्याची हेळसांड होत आहे. यापुुढे नियमित आरोग्य सेवा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 40 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातच आणखी 30 ते 35 लाखांच्या निधीची भर टाकून आरोग्य उपकेंद्राची अद्ययावत इमारत पंचक्रोशीतील नागरिकांच्या सेवेत लवकरच उभी राहणार आहे.’

या वेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई म्हणाले, कुकुडवाड गटामध्ये विकासकामाचा डोंगर उभा केला असून, सोळा गावांत टेंभूचे पाणी आणून हरितक्रांती केली आहे. व भविष्यातही या गटाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. 

जि. प. चे माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे म्हणाले, ‘आरोग्य उपकेंद्रासाठी तीनवेळा मंजूर झालेला निधी केवळ जागा उपलब्ध न झाल्याने परत गेला होता. मात्र, स्व. वसंतराव जगताप यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि सुवर्णाताई यांच्या जिकिरीच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे वरकुटे-मलवडीच्या विकासात एका अनमोल वास्तूची भर पडणार असून, जनसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.