sports

महाबळेश्‍वर येथील हवेच्या तपासणीचे दोन्ही अहवाल उत्तम

मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांची माहिती : प्रदूषण टाळण्याचे आवाहन

‘राज्याच्या पर्यावरण विभागाने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमांंतर्गत महाबळेश्‍वर येथील हवेची दोन वेळा गुणवत्ता तपासण्यात आली. या दोन्ही वेळी हवा तपासणीचे अहवाल उत्तम आहेत,’ अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. 

महाबळेश्‍वर : ‘राज्याच्या पर्यावरण विभागाने सुरू केलेल्या ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमांंतर्गत महाबळेश्‍वर येथील हवेची दोन वेळा गुणवत्ता तपासण्यात आली. या दोन्ही वेळी हवा तपासणीचे अहवाल उत्तम आहेत,’ अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली. 

पर्यावरण विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत राज्यातील सर्व नगरपालिकांनी भाग घेतला आहे. हवा, वायू, अग्नी, जल व पृथ्वी या पंचमहाभूतांचे संरक्षण व संवर्धन व्हावे या उद्देशाने ‘माझी वसुंधरा’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत महाबळेश्‍वर शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. काही ठराविक दिवसांच्या अंतराने शहरातील वाणिज्य विभाग रहीवास विभाग व अति गर्दीची ठिकाणे अशा तीन ठिकाणांची हवा तपासण्यासाठी घेण्यात आली. दोन्ही वेळेला हवेची गुणवत्ता चांगली आली आहे. ही गुणवत्ता टिकविण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. 

सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून नागरिकांनी परावृत्त व्हावे. यासाठी शहरातून प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. नागरिकांनी आपला कचरा जाळू नये. याबाबत सर्वांना सूचना देण्यात येते. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर बंगले आहेत, या बंगल्यातील पालापाचोळा जाळला जातो अशा प्रकारे पाला पाचोळा जाळू नये, यासाठी बंगल्यातील माळी लोकांना सूचना करण्यात आल्या आहेत. सूचना देऊनही जर कोणी पाला पाचोळा जाळला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. 

शहरातील मुख्य बाजारपेठ ही ब्रिटिश काळापासून नॉन व्हेईकल झोन आहे शहरातील इतर काही रस्त्यांवर अशा प्रकारे झोन लागु करता येतो का? याबाबत चर्चा सुरू आहे पर्यटकांनी व नागरिकांनी आपल्या वाहनांचा कमीत कमी वापर करून प्रदूषण टाळावे, असे आवाहनही पल्लवी पाटील यांनी केले.