संततधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान
शेतकरी आर्थिक अडचणीत; पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे कोरोनाच्या महामारीत विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
पाचगणी : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे कोरोनाच्या महामारीत विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
या पावसामुळे बटाटा, हायब्रीड, वाटाणा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बर्याच शेतजमिनीतील पिके पाणी साचल्याने कुजू लागली आहेत.त्याचबरोबर अतिपावसामुळे पिकांवर रोग पडू लागले आहेत. त्यामुळे शेतकर्यांची पिके मातीमोल होण्याच्या मार्गावर आहेत.
यावर्षी जून महिन्यात वेळेवर पाऊस पडल्याने शेतकर्यांनी वेळेवर पेरण्या उरकल्या होत्या.जुलै महिन्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या महिन्यात गेली दहा-बारा दिवसांपासून पडत असणार्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी शेतात पाणी साचले असून पिके पिवळी पडू लागली आहेत. ढगाळ वातावरणामुळे सुर्य दर्शन होत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. कृषी विभागाच्या वतीने पिकांच्या नुकसानची पाहणी करून महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
कोरोनामुळे शेतमालाची पुरती वाट लागली असून, शेतमालाला कवडी मोल भाव मिळत आहे. त्यातच गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे बटाटा, वाटाणा व हायब्रीड या पिकांना धोका पोहोचला असून, शेतकरी अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे.
- दिलीप आंब्राळे, शेतकरी, आंब्रळ.