sports

यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण जीवन मार्गदर्शक

यशेंद्र क्षीरसागर यांचे प्रतिपादन : कोरेगाव पंचायत समितीत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण जीवनकार्य मार्गदर्शक आहे. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू महत्त्वाचा आणि अनुकरणीय आहे,’ असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. 

कोरेगाव : ‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण जीवनकार्य मार्गदर्शक आहे. त्यांच्या जीवनाचा प्रत्येक पैलू महत्त्वाचा आणि अनुकरणीय आहे,’ असे प्रतिपादन सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. 

येथील कोरेगाव पंचायत समितीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी गटविकास अधिकारी क्रांती बोराटे तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. 

क्षीरसागर म्हणाले, ‘स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कर्तृत्व चौफेर होते. महात्मा फुले यांच्या महान कार्याचा आदर्श त्यांच्या समोर होता. धुरंधर राजकारणी, महान देशभक्त, उत्तम रसिक यासोबतच ते उत्कृष्ट साहित्यिक होते. कृष्णाकाठ, युगांतर, सह्याद्रीचे वारे अशी दर्जेदार साहित्यनिर्मिती त्यांनी केली. त्यांनी देशासाठी प्रचंड त्याग केला. प्रचंड कष्ट उपसले. द्वैभाषिक मुंबई राज्याचे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदांवर त्यांनी चिरंतन महाराष्ट्राचे भले होईल असे कार्य केले. शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्थापन केले आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची दारे खुली केली. राज्याच्या पंचवार्षिक योजना सुरू केल्या आणि महत्त्वाचे आर्थिक कार्य केले. सातार्‍यात सैनिक स्कूल सुरू केले.’

क्षीरसागर पुढे म्हणाले, ‘साहित्यिक, कलाकार यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. संस्कृतिक महाराष्ट्र घडविण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. भारताचे गृहमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री अशा सर्व महत्त्वाच्या पदांसह उपपंतप्रधानपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तसेच भारतावर चीनचे आक्रमण अशा विशेष प्रसंगी त्यांचे कार्य महान ठरले आहे. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला असे त्यामुळेच सार्थपणे म्हटले जाते.’