sports

महाबळेश्‍वरच्या ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत

‘मनसे विद्यार्थी सेने’ची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

महाबळेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात येत्या 15 दिवसांत व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत, अन्यथा प्रशासनास आंदोलनास सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे निवेदन महाबळेश्‍वर येथील ‘मनसे विद्यार्थी सेने’च्यावतीने तहसीलदार सुषमा पाटील व पालिका प्रशासनास देण्यात आले आहे.

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात येत्या 15 दिवसांत व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावेत, अन्यथा प्रशासनास आंदोलनास सामोरे जावे लागेल, अशा आशयाचे निवेदन महाबळेश्‍वर येथील ‘मनसे विद्यार्थी सेने’च्यावतीने तहसीलदार सुषमा पाटील व पालिका प्रशासनास देण्यात आले आहे.

या वेळी विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ओंकार पवार, ‘मनसे’चे राजेंद्र पवार, अशोक शिंदे, अरुण शिंगरे, विजय पवार, गुरू सुतार, प्रथमेश शिंदे, आशुतोष मोहिते आदी उपस्थित होते.

निवेदनातील अधिक माहिती अशी की, लॉकडाऊननंतर महाबळेश्‍वर पूर्वपदावर येत असून, प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार हॉटेल लॉजिंग व्यवसाय सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ देखील सुरू झाली आहे. शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. महाबळेश्‍वर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून, या ठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. महाबळेश्‍वर पूर्णपणे सुरू झाल्यावर देशातील पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, मात्र इथला आरोग्य विभाग सज्ज असल्याचे चित्र अद्यापही पाहायला मिळत नाही.
या उलट येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये कोविड किवा नॉन कोविड रुग्णांसाठी एकही ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध नाही, ही गंभीर बाब असून कोरोनाच्या आधी जर एखाद्या नागरिकाला व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन बेडची गरज पडली की रुग्णाला सातारा, वाई किंवा अन्य ठिकाणी हलवावे लागते. यातून अनेकांना आपले जीव गमावले लागले आहेत.
पण कोरोना सारखे महाभयंकर संकट येऊन देखील ग्रामीण रुग्णालय अजून व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडच्या प्रतीक्षेतच आहे.

अशा परिस्थितीत कोरोनाचे मोठे संकट डोक्यावर असताना येणार्‍या पर्यटकांना आपण सुरक्षेची हमी कसे देणार आहोत? पर्यटन लवकरात लवकर सुरू व्हावे, ही महाबळेश्‍वरमधील प्रत्येकाची भावना आहे. परंतु, तोकडी आरोग्य व्यवस्था असताना जर पर्यटकांना किंवा नागरिकांना कोणत्या प्रकारची हानी झाली तर त्याचे दूरगामी परिणाम हे पर्यटनावर होतील, त्यामुळे या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून महाबळेश्‍वर पुन्हा उभे राहण्यासाठी आरोग्य व्यवस्था लवकरात लवकर भक्कम करावी व त्यासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये येत्या 15 दिवसांत व्हेंटिलेटर व ऑक्सिजन बेड उबलब्ध व्हावेत, अन्यथा प्रशासनाला आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असेही शेवटी निवेदनात नमूद करण्यात आले आहे.