sports

धावत्या बसमध्ये प्रवाशांसाठी कोरोनाबाबत जनजागृती

‘माणदेशी तरंग वाहिनी’ची मोहीम; विधायक उपक्रमाचं होतंय कौतुक

राज्यभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरत आहे. त्याचबरोबर राज्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. यातच प्रशासन कोरोना निर्मूलनासाठी, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे दिसून येत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपलं काही देणं लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून  माणदेशी फाउंडेशन, म्हसवड (ता. माण)  संचलित माणदेशी तरंग वाहिनीच्या माध्यमातून आणि सामुदायिक रेडिओ संघटना तसेच युनिसेफ यांच्या सहकार्यातून कोरोना जनजागृती कार्यक्रम विविध माध्यमातून राबविण्यात येत आहे.

म्हसवड : राज्यभरात कोरोना विषाणूची दुसरी लाट पसरत आहे. त्याचबरोबर राज्यात कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. यातच प्रशासन कोरोना निर्मूलनासाठी, आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचे दिसून येत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाप्रती आपलं काही देणं लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून  माणदेशी फाउंडेशन, म्हसवड (ता. माण)  संचलित माणदेशी तरंग वाहिनीच्या माध्यमातून आणि सामुदायिक रेडिओ संघटना तसेच युनिसेफ यांच्या सहकार्यातून कोरोना जनजागृती कार्यक्रम विविध माध्यमातून राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसमध्ये जाऊन माणदेशी तरंग वाहिनीचे कर्मचारी प्रवाशांसाठी बसमध्ये कोरोना जनजागृती कार्यक्रम पार पाडत असताना दिसत आहेत. दरम्यान, सकाळी 10 ते 12 या वेळेत  सोलापूर-सातारा या लांब पल्ल्याच्या बसमध्ये म्हसवड ते पिलीव व सोलापूर-महाड या बसमध्ये पिलीव ते म्हसवड या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आरजे सचिन यांनी प्रवाशांना प्रबोधन करत त्यांनी कोरोना संक्रमणातून आपण कसे सुरक्षित राहिले पाहिजे, यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, कोविड लस घेतल्यानंतर आपण कोणती दक्षता घेतली पाहिजे याविषयी विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

याच वेळी आरजे अनुप आणि समर्थ गुजरे यांनी मास्क वाटप करून योग्य त्या पद्धतीने मास्क कसा घालावा, मास्क कसा वापरायचा, आपण वापरत असलेल्या मास्कची योग्य प्रकारे हाताळणी कशी करायची, जेणेकरून आपण या संक्रमणापासून वाचू शकेल. या विषयावर प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. अशाप्रकारे परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये जाऊन प्रवाशांची कोरोनाविषयी जनजागृती करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ असावी.

दरम्यान, माणदेशी रेडिओ आपली सामाजिक बांधिलकी जपत आपल्या रेडिओ वरून  सकाळ,  दुपार आणि संध्याकाळ अशा तीनही प्रसारण सभेतून कोविड लस व घ्यावयाची दक्षता, याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांच्या  प्रमुख उपस्थितीखाली मार्गदर्शन कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी म्हसवड बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक कोळी यांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेत प्रवाशांना मास्कचे वाटप करून सक्रिय सहभाग घेतला आणि या कार्यक्रमाचे कौतुक करीत, माणदेशी रेडिओस शुभेच्छा दिल्या.