sports

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पाचगणीच्या घाटजाई-काळेश्‍वरी देवीची यात्रा रद्द


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा उत्सव समारंभ यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. याच अनुषंगाने यावर्षी होणारी घाटजाई-काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली असून, फक्त धार्मिक विधीचे कार्यक्रम होणार आहेत, असे यात्रा कमिटीने सांगितले.  

पाचगणी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा उत्सव समारंभ यावर शासनाने निर्बंध घातले आहेत. याच अनुषंगाने यावर्षी होणारी घाटजाई-काळेश्‍वरी देवीची वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली असून, फक्त धार्मिक विधीचे कार्यक्रम होणार आहेत, असे यात्रा कमिटीने सांगितले.  

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वाढता प्रादुर्भाव पाहता यात्रा, उत्सव, सोहळे यावर पुन्हा एकदा निर्बंध घालण्यात आले आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग सुरू झाल्याने मागच्या वर्षी गावोगावच्या यात्रा होऊ शकल्या नव्हत्या. मात्र, यावर्षी कोरोनाचा फैलाव कमी होत गेला होता. त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्याने यावर्षी यात्रा होईल, असे वाटत असताना गेल्या आठ दिवसांपासून अचानक कोरोना संसर्ग वाढत असल्याने यात्रा, उत्सव, सोहळे यावर पुन्हा कडक निर्बंध आले आहेत.

पाचगणीच्या यात्रेला परिसरातील गावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. ही गर्दी पुन्हा कोरोना संसर्गाला कारणीभूत ठरू नये, याकरिता पाचगणी ग्रामस्थांनी दि. 7 व 8 मार्च 2021 रोजी होणारी घाटजाई-काळेश्‍वरी देवीची यात्रा साजरी न करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला आहे. यात्रा काळात देवीचे मंदिर भाविकांसाठी दर्शनास बंद राहणार आहे. तर देवीचा धार्मिक विधी कोरोनाचे सर्व नियम व सूचना पाळून विधिवत पार पडणार आहे.

यात्रेबाबत यात्रा कमिटीची मीटिंग दि. 18 फेबु्रवारी रोजी झाली. यावेळी घाटजाई काळेश्‍वरी विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष अजित कासुर्डे, ग्रामस्थ  नानासाहेब कासुर्डे, शेखर कासुर्डे, किसन कासुर्डे, शरद कासुर्डे, विजय कासुर्डे, सूर्यकांत कासुर्डे, उपस्थित होते.