sports

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाचगणी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् बंद


राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांच्या गर्दीमुळे पाचगणी शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आले आहेत.

पाचगणी : राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे नागरिकांच्या गर्दीमुळे पाचगणी शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पालिका हद्दीतील विविध पॉइंटस् सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात आले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र लॉकडाऊन व जिल्हा बंदी असल्यामुळे सर्वजण आपापल्या घरातच अडकून पडले होते. आता केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारनेही अनलॉक केल्यामुळे शहरातील हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहर व परिसरातील हॉटेल व खासगी बंगल्यात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पाचगणीत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पाचगणी पालिका मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी शहरात कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांबाबत कर्मचार्‍यांची आढावा बैठक घेतली. शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून बारा पथके तयार करण्यात आली आहेत. 

शहरात मास्क न वापरणे, सुरक्षित अंतराचे पालन न करणारे तसेच निष्कारण गर्दी करणार्‍यांवर पोलीस व पालिकेच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यात एकीकडे कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे. तर दुसरीकडे पर्यटन स्थळांवरील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था संकटात आली आहे.