भिलार ‘वॉटरफॉल’ नजीकच्या डोंगरात वणवा
काही झाडे जळून खाक : आग विझविण्यात पालिका कर्मचार्यांना यश
महाबळेश्वर-पाचगणी राज्यमार्गावरील भिलार वॉटर फॉल नजीकच्या डोंगररांगेमध्ये शुक्रवारी सकाळी वणवा लागला. वार्याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली.
पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी राज्यमार्गावरील भिलार वॉटर फॉल नजीकच्या डोंगररांगेमध्ये शुक्रवारी सकाळी वणवा लागला. वार्याचा वेग अधिक असल्याने ही आग वेगाने पसरत गेली.
याबाबत माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी धावले. तसेच पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेचा अग्निशामक दलाचा बंब तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आला. परंतु, डोंगरांचा उतार पाहता तिथपर्यंत वाहने पोहोचू शकली नाहीत. कर्मचार्यांनी झाडांच्या फांद्या तोडून ही आग विझविण्याचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साधारणपणे नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान गणेशपेठ डोंगरामध्ये आग लागली. सध्या डोंगरावरील गवत आणि झाडोरा वाळलेला असल्याने घर्षणामुळे आग लागू शकते, असे सांगण्यात आले. वार्याचा वेग अधिक असल्याने झपाट्याने आग पसरत चालली होती.
वणव्याबाबत माहिती समजताच पालिकेचे कर्मचारी सूर्यकांत कासुर्डे, अफझल डांगे, जगदीश बगाडे, सागर बगाडे घटनास्थळी रवाना झाले. बंबाच्या साहाय्याने शक्य होईल तेवढ्या परिसरातील वणवा विझविण्यात आला. डोंगराच्या खाली वाहने जाऊ शकत नसल्याने कर्मचार्यांनी झाडांच्या आणि झुडपांच्या ओल्या फांद्या तोडून जीवाची बाजी लावत हा वणवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आग वेगाने पसरत चालल्याने कर्मचार्यांना चांगलीच कसरत करावी लागली.