हस्तनपूरच्या उजाड माळरानावर वनविभागाने फुलवली वनराई..!
ऐन उन्हाळ्यात टँकरने झाडांना पाणी : 50 हेक्टर क्षेत्रावर 31250 वृक्ष
हस्तनपूर (ता. माण) येथील 50 हेक्टर उजाड माळरानावर वनविभाग दहिवडी यांनी विविध प्रकारची 31250 वृक्ष लावून त्यांना चार टँकरने नियमित पाणी देऊन वनराई फुलवली आहे. या वनराईसाठी हस्तनपूर ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य वनविभागाला मिळत असल्याने ऐन उन्हाळ्यात वनराई हिरवीगार दिसून येत आहे.
बिजवडी : हस्तनपूर (ता. माण) येथील 50 हेक्टर उजाड माळरानावर वनविभाग दहिवडी यांनी विविध प्रकारची 31250 वृक्ष लावून त्यांना चार टँकरने नियमित पाणी देऊन वनराई फुलवली आहे. या वनराईसाठी हस्तनपूर ग्रामस्थांचेही मोठे सहकार्य वनविभागाला मिळत असल्याने ऐन उन्हाळ्यात वनराई हिरवीगार दिसून येत आहे.
माण तालुक्यात हस्तनपूर गावाचे पाणी फाउंडेशनचे काम सर्वज्ञात आहे. लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात गाव व परिसरात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. या गावाच्या बाजूलाच उजाड माळरानावर वनविभागाचे 50 हेक्टर क्षेत्र आहे. दोन वर्षांपूर्वी याच उजाड माळरानावर 50 हेक्टर क्षेत्रात वनविभागाने वृक्षलागवडीचा मोठा प्रोजेक्ट हाती घेतला असून यात चिंच, करंज, लिंब, शिशू, वड, वावळा आदी प्रकारची 31 हजार 250 वृक्ष लावण्याची ऐतिहासिक कामगिरी वनविभागाने करून दाखवली आहे.
वनक्षेत्रपाल एम. पी. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ठोंबरे, सावंत ऐन उन्हात ही झाडांची काळजी घेताना दिसून येत आहेत. त्यांना वनकर्मचारी तसेच गावातील संयुक्त वन व्यवस्था समिती व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
माळरानावरील वृक्षांना पाणी घालण्यासाठी गावातील स्थानिक टँकरमालक आपल्या टँकरने नियमित पाणी घालून वृक्षसंगोपनाचे कार्य चोख बजावत आहेत. यामुळे सर्वांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वनराईने ऐन उन्हाळ्यात हिरवागार शालू पांघरल्याचे दिसून येत आहे. वनविभागाने या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
वणवा हा निसर्गनिर्मित नसून कृत्रिम आहे. कोणतरी विघ्नसंतोषी मजा पाहण्यासाठी वणवा लावतात. मात्र यामुळे वनविभाग, ग्रामस्थ, वनपाल, कर्मचारी यांचे कष्ट वाया जाते. मात्र, यावर वनक्षेत्रपाल एम. पी. मुळे यांनी वणवा लागला तरी वृक्षांना वणव्याची हाय लागू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. माण तालुक्यातील हा आदर्शवत वनराईचा मोठा प्रोजेक्ट असून काही वर्षातच हा लोकांसाठी पिकनिक पॉईंट होईल.
हस्तनपूर (ता. माण) येथे वनराईत वनविभागाचा हा पायलट प्रोजेक्ट असून, दोन वर्षात चांगली संगोपन केल्याने याठिकाणी वनराई चांगली फुलली आहे. एक-दोन वर्षातच माण तालुक्यातील पर्यटकांना आकर्षित करणारा हा प्रोजेक्ट ठरेल. माझ्यावर व वनपालांवर केलेले आरोप काहींनी स्वार्थापोटी खोटे केले असून, या खोट्या आरोपांकडे लक्ष न देता आम्ही वनराईचे काम असेच चालू ठेवून एक आयडीयल वनराई उभारू.
- एम. पी. मुळे, वनक्षेत्रपाल, वनविभाग, दहिवडी.
वनराईतील वृक्षांना टँकरचालक नियमितपणे पाणी घालत असून त्यांच्यावर आमच्या समितीचे व वनपाल,वनकर्मचार्यांचे लक्ष आहे. वेळच्या वेळी पाणी मिळत असल्याने सर्वच वृक्ष चांगली आली आहेत.
- दादासो मुळीक, अध्यक्ष, संयुक्त वनव्यवस्था समिती, हस्तनपूर, ता. माण.
हस्तनपूरच्या वनराईला आम्ही नियमितपणे पाणी घालत असून, शासनाकडून मिळणारा निधी आम्हाला वनविभागाकडून नियमितपणे मिळत आहे. आमच्याच परिसरात एवढे मोठे काम वनविभागाने हाती घेतल्याने वनराईत वाहनांना येण्यासाठी आम्ही स्वखर्चाने कच्चे रस्ते तयार करून घेतले आहेत.
- एकनाथ कदम, टँकर मालक, अनभुलेवाडी, ता. माण.
वृक्षांना पाणीपुरवठा करण्याचे काम स्थानिक टँकर मालकांना दिले असून ते नियमितपणे आमच्या समक्ष पाणीपुरवठा करत आहेत अन् त्याचे रोजचे रोज त्यादिवसाचे फोटो दिनांक, वेळनुसार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले जातात.
- अनिल निकम, वनकामगार, हस्तनपूर, ता. माण.