जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानासमोर जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती
हजारो लिटर पाण्याची नासाडी; जनतेतून तीव्र नाराजी
जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानासमोर जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून, या गळतीमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाण्याच्या होणार्या या अपव्ययाबद्दल सातारकर जनतेतून जीवन प्राधिकरणाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सातारा : जिल्हाधिकार्यांच्या निवासस्थानासमोर जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून, या गळतीमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. पाण्याच्या होणार्या या अपव्ययाबद्दल सातारकर जनतेतून जीवन प्राधिकरणाच्या या भोंगळ कारभाराविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील सार्वजनिक बांधकाम भवनासमोर सातार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे शासकीय निवासस्थान आहे. त्यांच्या या शासकीय निवासस्थान समोरून मुख्य रस्त्यालगत जीवन प्राधिकरणाची शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी गेलेली आहे. जीवन प्राधिकरणाच्या या मुख्य जलवाहिनीला गळती लागली असून, या गळतीतून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळतीतून हे पाणी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून पोवई नाक्याकडे जाणार्या मुख्य रस्त्यावरून वाहत असल्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणारे पादचारी आणि दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना याठिकाणी अक्षरशः कसरत करून ये-जा करावे लागत आहे. याठिकाणी थोडासा उतार असल्यामुळे जवळ आल्याशिवाय दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना या मुख्य रस्त्यावर आलेले पाणी दिसत नाही. परंतु, अचानक रस्त्यावरील पाणी दिसल्यामुळे आपल्या वाहनांचा वेग कमी-जास्त करण्यामध्ये याठिकाणी एखाद्या किरकोळ किंवा गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या चार-पाच महिन्यापूर्वी जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला नेमकी याच ठिकाणी गळती लागली होती. त्यावेळीही दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली होती. याबाबतचे वृत्त दै. ‘मुक्तागिरी’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दै.‘मुक्तागिरी’मधील वृत्ताची तातडीने दखल घेऊन जीवन प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकार्यांना व कर्मचार्यांना मुख्य जलवाहिनीला झालेली गळती त्वरित दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानंतर दोनच दिवसांत जीवन प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी मुख्य जलवाहिनीला झालेल्या गळतीचे काम तातडीने पूर्ण करून सदरची गळती थांबवली होती.
परंतु, पुन्हा त्याच ठिकाणी मुख्य जलवाहिनीला गळती लागलेली असून, या गळतीमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ही पाण्याची होणारी नासाडी रस्त्यावरून जाणारे पादचारी आणि दुचाकी व चारचाकी वाहन चालक पाहत आहेत आणि पाण्याच्या होणार्या नासाडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
जिल्हाधिकार्यांच्या शासकीय निवासस्थान शेजारीच निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आणि शासकीय अधिकारी व कर्मचार्यांची शासकीय निवासस्थाने आहेत. जिल्हा प्रशासनामध्ये असलेल्या या उच्चपदस्थ अधिकार्यांच्या निवासस्थानासमोरच जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीतून होणार्या पाण्याच्या नासाडीबद्दल सर्वसामान्य सातारकर जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून, जिल्हाधिकार्यांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना तातडीने आदेश देऊन जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीतून होणारी पाण्याची नासाडी त्वरित थांबविण्याची मागणी सर्वसामान्य सातारकर जनतेतून होत आहे.