कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मंगळवार, दि. 15 पासून वडूजचे भाजपचे नगरसेवक अनिल माळी धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
वडूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मंगळवार, दि. 15 पासून वडूजचे भाजपचे नगरसेवक अनिल माळी धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.
या निवेदनात दिलेली अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यात कोरोना संसर्गजन्य आजाराने उग्र रूप धारण केले असून, गावागावांत दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत बाधित रुग्णांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने वडूज परिसरात आणखी एक कोविड सेंटर सुरू करावे. वडूजच्या ग्रामीण रुग्णालयात फक्त नावालाच कोरोना कक्ष तयार करण्यात आला असून, त्याठिकाणी रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड नाहीत. मायणी येथील मेडिकल कॉलेजच्या कोविड सेंटरला मर्यादा येऊ लागल्या आहेत.
तसेच सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्येही बेड उपलब्ध होत नाहीत. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने डांबेवाडी येथील एक तरुण व अन्य काही नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना आहेत. तरी वडूज या ठिकाणी जम्बो कोविड सेंटर उभारून त्यामध्ये ऑक्सिजन सुविधा, व्हेंटिलेटर तसेच तज्ज्ञ डॉक्टरांच्यामार्फत रुग्णांवर उपचार करावेत. आणि व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची संख्या कमी असल्याने तसेच योग्य उपचार पद्धती नसल्याने सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त त्यात सुधारणा व्हावी.
तसेच सिव्हिल हॉस्पिटलला रुग्णास नेल्यानंतर तेथील अधिकारी व कर्मचारी बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगत खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रासांना व मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. तसेच मायणी येथील कोविड सेंटरमध्ये सुविधा चांगल्या मिळत असल्याने तेथे 200 बेड उपलब्ध करून ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून द्यावी व वडूजच्या ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने नागरिकांना अडचणींना सामोरं जावे लागत आहे.
याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा 15 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असून, यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा ही त्यांनी निवेदनात दिला आहे.