sports

छ. शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली

सुरेश पवार यांचे प्रतिपादन : छ. शिवाजी कॉलेजमध्ये ऑनलाइन व्याख्यान संपन्न

‘मध्ययुगीन काळात अनेक सत्तांनी अनियंत्रित राजेशाहींचा अवलंब केला असताना शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राजेशाहीचा अवलंब केला. शिवकाळातील राजकारण हे समाजहितासाठी होते. जनतेच्या अडचणी सोडविणे त्यांना वेळेत न्याय मिळवून देणे, या गोष्टी महाराज स्वतःचे आद्यकर्तव्य समजत होते. शिवाजी महाराज म्हणजे भविष्याचा वेध घेणारे एक महान असे कर्मयोगी राजे होते. समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ महाराजांनी अंधकारमय समजल्या जाणार्‍या मध्ययुगातच रोवली ही गोष्ट नक्कीच आजच्या राजकारणाला, सत्तेलाही मार्गदर्शक ठरावी अशीच आहे,’ अ

सातारा : ‘मध्ययुगीन काळात अनेक सत्तांनी अनियंत्रित राजेशाहींचा अवलंब केला असताना शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राजेशाहीचा अवलंब केला. शिवकाळातील राजकारण हे समाजहितासाठी होते. जनतेच्या अडचणी सोडविणे त्यांना वेळेत न्याय मिळवून देणे, या गोष्टी महाराज स्वतःचे आद्यकर्तव्य समजत होते. शिवाजी महाराज म्हणजे भविष्याचा वेध घेणारे एक महान असे कर्मयोगी राजे होते. समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ महाराजांनी अंधकारमय समजल्या जाणार्‍या मध्ययुगातच रोवली ही गोष्ट नक्कीच आजच्या राजकारणाला, सत्तेलाही मार्गदर्शक ठरावी अशीच आहे,’ असे प्रतिपादन सुरेश पवार यांनी केले. 

येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमधील इतिहास विभागाने राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत (रुसा) ‘शिवबा आमचा राणा, मराठी आमचा बाणा’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व ‘रयत’चे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर होते.

पवार म्हणाले, ‘महाराजांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे वेळोवेळी या गोष्टी सिद्ध करून तडीस नेल्या आहेत. उदा. आपल्या मातोश्री जिजाऊ यांना सती जाण्यापासून रोखणे, रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये, भ्रष्टाचारी लोकांचे हातपाय कलम करणे, परस्त्री मातेसमान मानने आदी. छत्रपती शिवाजी महाराज हे खर्‍या अर्थाने लोकराजे होते, कारण त्यांनी धर्म व जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहिले व प्रत्यक्ष कृतीत आणले.

डॉ. शिवणकर म्हणाले, ‘शिवाजी महाराज हे अलौकिक गुणवैशिष्ट्य संपन्न व्यक्तिमत्त्व होते. तसेच त्यांनी शिवाजी महाराज हे सर्वधर्म समभाव मानणारे महान असे धर्मनिरपेक्ष राजे होते याचे विविध दाखले दिले.’

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. अनिसा मुजावर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अनिलकुमार वावरे, ‘रुसा’चे समन्वयक डॉ. सुभाष कारंडेे व इतिहास विभागातील सहकारी प्रा. मनोहर निकम व डॉ. दत्तात्रय कोरडे यांचे सहकार्य लाभले.

इतिहास विभाग प्रमुख डॉ. धनाजी मासाळ यांनी प्रास्ताविक केले. समन्वयक डॉ. विकास येलमार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. महादेव चिंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनिल कोकाटे यांनी आभार मानले.