सततच्या पावसामुळे पुसेगाव परिसरातील खरीप हंगाम संकटात
उत्पादन घटण्याची शक्यता; शेतकरी चिंताग्रस्त
पुसेगावसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिके पिवळी पडू लागली असून, पिकांची वाढ देखील खुंटली आहे. तसेच पिकांवर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पेरणीस केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.
पुसेगाव : पुसेगावसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिके पिवळी पडू लागली असून, पिकांची वाढ देखील खुंटली आहे. तसेच पिकांवर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पेरणीस केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.
मान्सूनपूर्व पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, घेवडा, मका, कडधान्य पिकांचे समाधानकारक उत्पादन होण्याची अपेक्षा शेतकर्यांना होती. मात्र, सतत ढगाळ वातावरण आणि कधी रिमझिम, तर कधी जोरदार पाऊस पडत असल्याने सोयाबीन, घेवडा आदी पिकांची फूल गळ होऊ लागल्याने उत्पन्नात घट होणार आहे. तसेच सततच्या पावसाने वाफसा मिळत नसल्याने आर्थिक भांडवल मोठ्या प्रमाणात लागणार्या बटाटा, आल्याचे पीक देखील अडचणीत आले आहे. यामुळे आले बागायती पिकाची लागवड करणारा शेतकरी देखील चिंतातूर झाला आहे.
मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत 15 दिवस जोरदार पाऊस, त्यानंतर आठ-दहा दिवस उघडझाप अशीच परिस्थिती राहते. जुलै महिन्यात पावसाचा जोर राहतो, त्यानंतर हळूहळू जोर कमी येतो. श्रावण महिन्यात तर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळतो. अशा प्रकारचा पाऊस पिकांना पोषक असतो. पिकांना सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर त्याच्या वाढीवर परिणाम होतो. सद्य:स्थितीत पंधरा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने त्याचा फटका पिकांना बसत आहे.
पिकांमध्ये तण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. आंतरमशागतीची कामे थांबली आहेत. पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततच्या पावसामुळे फवारणी करणे शक्य नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. पुसेगावसह परिसरात आणखी 15 दिवस असाच पाऊस राहिला, तर ओल्या दुष्काळाचे संकट पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.