sports

विद्यार्थी चांगले घडल्याचा आनंद खूप मोठा असतो

आर. डी. गायकवाड : छ. शिवाजी कॉलेजमध्ये सेवानिवृत्ती गौरव समारंभ संपन्न

‘कर्मवीरांनी आम्हाला कष्टांचा संस्कार दिला. त्यामुळे आम्हाला कधीही शेण काढण्याची लाज वाटली नाही. आम्ही विहिरी खोदल्या, भाज्या विकल्या, खडी फोडली त्यामुळे आमचे जीवन चांगले घडले. भाऊराव पाटील यांनी संस्थेची उभारणी केली. पुढच्या काळात त्यांच्या संस्कारात वाढलेल्या मुलांनी संस्थेचा प्रचंड विस्तार केला. आम्ही कॉलेजला शिक्षक झालो तेव्हा हिंमतीने कामे केली. आज बाडसारखी मुले स्वतःचा व्यवसाय करून मोठी प्रगती करतात. शिक्षकाला दुसरे काय लागते? विद्यार्थी चांगले घडल्याचा आनंद शिक्षकास मोठा असतो,’ असे विचार

सातारा : ‘कर्मवीरांनी आम्हाला कष्टांचा संस्कार दिला. त्यामुळे आम्हाला कधीही शेण काढण्याची लाज वाटली नाही. आम्ही विहिरी खोदल्या, भाज्या विकल्या, खडी फोडली त्यामुळे आमचे जीवन चांगले घडले. भाऊराव पाटील यांनी संस्थेची उभारणी केली. पुढच्या काळात त्यांच्या संस्कारात वाढलेल्या मुलांनी संस्थेचा प्रचंड विस्तार केला. आम्ही कॉलेजला शिक्षक झालो तेव्हा हिंमतीने कामे केली. आज बाडसारखी मुले स्वतःचा व्यवसाय करून मोठी प्रगती करतात. शिक्षकाला दुसरे काय लागते? विद्यार्थी चांगले घडल्याचा आनंद शिक्षकास मोठा असतो,’ असे विचार रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व कौन्सिल सदस्य प्राचार्य आर. डी. गायकवाड यांनी व्यक्त केले. 

येथील छ. शिवाजी कॉलेज येथे स्टाफ वेल्फेअर समिती व प्रशासन यांनी आयोजित केलेल्या डॉ. अनिसा मुजावर, डॉॅ. मानसी लाटकर व प्रा. अशोक सस्ते सेवानिवृत्ती गौरव व सदिच्छा समारंभात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे हे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले, ‘डॉ. अनिसा मुजावर यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केली. घडाळ्याकडे बघून सेवा न करता पूर्ण वेळ संस्थेसाठी योगदान दिले आहे. इंग्रजीच्या उत्कृष्ट टीचर त्या आहेत.डॉ. मानसी लाटकर यांच्या अभ्यासपूर्ण योगदानाबद्द्ल त्यांनी त्यांचे कौतुक करून त्यांच्या स्वतःच्या आईच्या ओव्या सादर करून स्त्रियांच्या लोकाविष्कारात प्रतीकात्मकता कशी येते, ते सांगितले. अशोक सस्ते आजारातून लवकर बरे व्हावेत अशाही भावना त्यांनी व्यक्त केल्या.’ 

डॉ. कांचन नलावडे म्हणाल्या, ‘डॉ. अनिसा मुजावर यांनी पदाला योग्य न्याय दिला. डॉ. मानसी लाटकर या गंभीर व विनोदी व्यक्तिमत्व असल्याचे सांगितले. 

डॉ. मानसी लाटकर म्हणाल्या, ‘छ. शिवाजी कॉलेजने मला शैक्षणिक वातावरण, वैचारिक भूमिका आणि नैतिकता दिली. डॉ. सुनंदा चव्हाण, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. सुमन पाटील आदी मार्गदर्शक जीवनात आल्यामुळे हा शिक्षक म्हणून प्रवास चांगला झाला.’

डॉ. अनिसा मुजावर म्हणाल्या, ‘माझे वडील अतिशय प्रामाणिक शिक्षक होते. त्यांच्यामुळेच मला शिक्षक व्हावे वाटले. डॉ. सुनंदा चव्हाण यांच्याकडून मला सगळ्यांशी जुळवून घेणे, स्वतःचे मत व्यवस्थित व्यक्त करणे हे शिकावयास मिळाले. मी 14 प्राचार्यांच्या हाताखाली काम केले. छत्रपती शिवाजी कॉलेजचा एसएसआर मी लिहिला त्याचे नॅककडून कौतुक झाले. एकमेकांसाठी कसा त्याग करावा हे माझ्या  सासरचे वैशिष्ट्य होते. घरातून चांगली साथ मिळाल्यामुळे मला चांगले काम करता आल्याचे त्यांनी सांगितले.

या समारंभास डॉ. अनिसा मुजावर, डॉ. मानसी लाटकर यांचे कुटुंबीय, प्राध्यापक व उपस्थित होते. 

प्रारंभी स्टाफ वेल्फेअर समितीचे प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य आर. डी. गायकवाड व डॉ. अशोक भोईटे यांचा सत्कार डॉ. सुभाष वाघमारे यांनी केला. डॉ. अनिसा मुजावर व डॉ. मानसी लाटकर यांना सन्मानचिन्ह, चांदीचे नाणे देऊन गौरव करण्यात आला. 

डॉ. रोशनआरा शेख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संदीप किर्दत यांनी आभार मानले.