आंब्रळच्या सरहद्दीवर रस्त्याचे बेकायदेशीरपणे उत्खनन
उत्खननात वनविभागाची टेकडीही जमीनदोस्त : रस्ता पूर्ववत करण्याची ग्रामस्थांची मागणी
महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ ग्रामपंचायत परिसरात राजपुरी व आंब्रळच्या सरहद्दीवर असणार्या एका धनिकाने आपल्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीजवळचा रस्ता जेसीबीने खोदून रहदारीसाठी बंद केला. तब्बल वीस फुटांपेक्षा अधिक रस्ता खोदण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.
पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ ग्रामपंचायत परिसरात राजपुरी व आंब्रळच्या सरहद्दीवर असणार्या एका धनिकाने आपल्या बंगल्याच्या सुरक्षा भिंतीजवळचा रस्ता जेसीबीने खोदून रहदारीसाठी बंद केला. तब्बल वीस फुटांपेक्षा अधिक रस्ता खोदण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले.
रविवारी सकाळी बेकायदेशीर उत्खननाची माहिती मिळताच आंब्रळच्या सरपंच माधुरी आंब्राळे, उपसरपंच उमेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य सारिका आंब्राळे, भानुदास बिरामणे, पोलीस पाटील सुप्रिया आंब्राळे यांनी बेकायदेशीर उत्खननाचा पंचनामा करून महसूल विभागाशी संपर्क साधला.
सार्वजनिक रस्ता अशा पद्धतीने खोदता येणार नाही, अशी भूमिका घेतली. कंपाउंड हद्दीतून जाणारा सार्वजनिक रस्ता दीपक करोडे या धनिकाने शनिवारी रात्रीच्या सुमारास जेसीबीने खोदून बंद पाडण्याचा प्रयत्न केला असून बंगल्याच्या शेजारील वनविभागाचे प्राचीन काळातील 10 ते 15 फुटांची टेकडी जमीनदोस्त केली आहे.
या टेकडीमध्ये प्राचीन काळातील वनविभागाची पेव होती. ही टेकडी सदर धनिकाने कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे टेकडीचे उत्खनन केलेले आहे.तसेच सदर इमारतीमध्ये बेकायदेशीर लॉजिंग व्यवसाय सुरू असल्याचे व या व्यवसायाचे लायसन नसून ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नसल्याचे आंब्रळ ग्रामपंचायतीने केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
आंब्रळच्या सरपंच माधुरी आंब्राळे यांनी उत्खनन करू नये, याबाबत दोन वेळा फोनवरून चर्चा केली होती. परंतु स्थानिकांची ये-जा सदर धनिकाला नकोशी झाल्याने सरपंचाचे म्हणने ऐकून न घेता बेकायदेशीर उत्खनन केले आहे. आंब्रळ व राजपुरी ग्रामस्थांचा वर्षानुवर्षे असलेला गुरेचराईचा रस्ता आम्हाला हवा आहे, अशी सदर रस्त्यावरून ये-जा करणार्या ग्रामस्थांची मागणी आहे.