sports

महाबळेश्‍वरमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा प्रारंभ

नागरिकांनी मोहिमेला सहकार्य करण्याचे मुख्याधिकार्‍यांचे आवाहन

कोरोनाच्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्‍वर बाजारपेठेतील व्यापारी कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करून करण्यात आली. या वेळी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकार्‍यांनी केले.

महाबळेश्‍वर : कोरोनाच्या नियंत्रणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची अंमलबजावणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबळेश्‍वर बाजारपेठेतील व्यापारी कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करून करण्यात आली. या वेळी नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकार्‍यांनी केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही योजना राज्यात राबवण्याचा निर्णय जाहीर केला. या मोहिमेचा शुभारंभ पालिकेच्यावतीने करण्यात आला. या मोहिमेची माहिती देताना मुख्याधिकरी पाटील म्हणाल्या, ‘या मोहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांमधील कोविडची लक्षणे शोधून त्यांना तातडीने उपचार मिळवून देणे तसेच कोविड रुग्णांनी नंतर कोणती काळजी घ्यायची याबाबतीत नागरिकांचे आरोग्य प्रबोधन करणे अपेक्षित आहे. यासाठी दोन टप्प्यांत ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा आजपासून सुरू करण्यात आला आहे तर दुसरा टप्पा 14 आक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहे.’

या मोहिमेंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून ही माहिती राज्य शासनाने दिलेल्या अ‍ॅपमध्ये नोंद करण्यात करण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी सांगितले.

नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी पालिकेच्यावतीने प्रत्येक वॉर्डात पथकाची नेमणूक केली आहे. या पथकामध्ये प्रशिक्षित पालिका कर्मचारी, स्वयंसेवक व नर्सिंग कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक नागरिकांचे तापमान व त्यांच्या ऑक्सिजनची लेवल यांची तपासणी करणार आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे. आपल्या घरी आलेल्या पथकाला सर्व माहिती द्यावी. काही माहिती लपवू नये तसेच या मोहिमेची कोणतीही भीती बाळगू नये. ही मोहीम आपल्यासाठीच असून, आपण व आपले कुटुंब यांची जबाबदारी आपली आहे.

याबाबत नागरिकांचे आरोग्य प्रशिक्षण घेऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कोविडची बाधा होऊ नये तसेच कोविड रुग्णांनी व कोविडमधून मुक्त झालेल्या रुग्णांनी पुन्हा कोविड बाधा होऊ नये यासाठी कोणकोणती खबरदारी घ्यायची, याची सर्व माहिती पथकाकडून नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. यासाठी पालिकेने नेमलेल्या पथकामधील सर्व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही मुख्याधिकार्‍यांनी दिली. 


मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे : नगराध्यक्षा शिंदे
महाबळेश्‍वर लवकरच कोरोनामुक्त करण्याचा निर्धार पालिकेने केला आहे. यामध्ये यशस्वी होण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी केले आहे.