sports

दडसवस्तीच्या ओढ्यावर लोंबकळणार्‍या वीज तारा ठरताहेत धोकादायक

महावितरणच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये नाराजी 

माण तालुक्यातील येळेवाडी गावातील दडसवस्ती येथे असणार्‍या ओढ्यावर लोंबकळलेल्या वीज तारा नागरिकांसाठी व जनावरांसाठी धोकादायक असतानासुद्धा तेथून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिक महावितरणच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.

बिदाल : माण तालुक्यातील येळेवाडी गावातील दडसवस्ती येथे असणार्‍या ओढ्यावर लोंबकळलेल्या वीज तारा नागरिकांसाठी व जनावरांसाठी धोकादायक असतानासुद्धा तेथून प्रवास करावा लागत असल्यामुळे नागरिक महावितरणच्या विरोधात प्रचंड नाराजी व्यक्त करत आहेत.

उघडे असलेले रोहित्र व घरांवर लोंबकळलेल्या विजेच्या तारांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

दहिवडी येथील वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिटर रीडिंग न तपासता तसेच त्या मिटरवरून विजेचा किती वापर होेतो, याची कोणतीही शहानिशा न करता मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा विद्युत बिले देण्यात येत आहेत. त्यामुळे गोरगरीब ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. मात्र, काही विद्युत ग्राहकांचा विजेचा वापर जास्त असतानाही त्या विभागाचे संबंधित अधिकारी तथा लाईनमन यांचे हितसंबंध असल्याने अनेक बिले कमी जास्त प्रमाणात देण्यात येत आहेत. अशा प्रकारामुळे विद्युत वितरण कंपनीचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. एखाद्या वेळेस शॉर्टसर्किट व इतर कारणामुळे कृषी पंपाची वीज बंद पडल्यास दोन-दोन दिवस विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही.


वीज वितरणच्या मनमानीमुळे नागरिक त्रस्त
वीजवितरण कंपनी संदर्भात लोकप्रतिनिधी सुद्धा उदासीन दिसत असून, नेमका न्याय मागायचा कोणाकडे, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना व सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या मनमानी धोरणामुळे नागरिक सध्या त्रस्त झाले आहेत.