काल संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर वर्धनगड घाटातील 200 फूट खोलीच्या दरीत पडल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला. कोरोगावकडे जाताना वर्धनगड घाटातील दुसऱ्या वळणावर उसाने भरगच्च भरलेल्या या ट्रॅक्टरचा डाव्या बाजूचा ॲक्सल तुटून चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रॉलीसह हा ट्रॅक्टर दरीत पडला. पण चालकाने अवधान दाखवून ट्रॅक्टरमधून उडी मारल्याने तो बचावला.
कण्हेर, ता. सातारा गावच्या हद्दीत छोटा हत्ती टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात आठ मजूर जखमी झाले. टेम्पो उतारावरून येत असताना चालकाने अचानक ब्रेक मारून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आझाद मैदान (मुंबई) येथे गुरुवार 23 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांची गारानी मांडण्यासाठी आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी दिवसभर थांबूनही सरकारने शेतकऱ्यांचे गाराने ऐकले नाही. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारच्या निषेधार्थ बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने १ जानेवारी २०२२ हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
खटाव, ता. खटाव गावच्या हद्दीत अवैध वाळु तस्करांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून ६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी करण राजेंद्र पाचागणे, कैलास अंकुश गलांडे, ओमकार धनाजी पाटोळे, निलेश बाळु मदने, सर्व रा. खटाव, ता. खटाव यांना ताब्यात घेण्यात आले असून खटाव येथीलच गणेश उर्फ रजनीकांत शंकर शिंदे हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
राजवाडा बसस्थानकांमध्ये दि. २० डिसेंबर रोजी प्रशासनाची परवानगी न घेता भिंती शिल्पाचे अनावरण केल्याप्रकरणी २१ जणांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात पुणे दाखल करण्यात आले असून या घटनेच्या अनुषंगाने २८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांनी दिली.
शहरातील दत्त चौक परिसरात एका युवकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या भांडणाचा राग मनात शनिवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये संबंधित युवक जखमी झाला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
गोडोली, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने ५ हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाच्या खोडाची चोरी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
गोडोली, ता. सातारा येथील जकात नाक्यासमोर पूर्ववैमनस्यातून एकाला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली याबाबत संबंधित दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, यासाठी कराड शहर वाहतूक शाखेच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीगिरी पद्धतीने हेल्मेट जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
कराड येथील विभागीय कार्यशाळेच्या कर्मचाऱ्याने चालक, वाहक नसलेल्या एस.टी. बस मधुन प्रवाशांची अनधिकृतपणे वाहतुक केल्याचा प्रताप आज सकाळी सातारा येथील पोवई नाक्यावर उघडकीस आला. विसावा नाका येथुन काही युवकांनी या एस.टी.चा पाठलाग करून संबंधित कर्मचाऱ्यांचे पितळ उघड पाडल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने माफीनामा दिला.