चालक, वाहक नसलेल्या एस.टी.तुन प्रवाशांची वाहतूक
कराड येथील विभागीय कार्यशाळेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप
कराड येथील विभागीय कार्यशाळेच्या कर्मचाऱ्याने चालक, वाहक नसलेल्या एस.टी. बस मधुन प्रवाशांची अनधिकृतपणे वाहतुक केल्याचा प्रताप आज सकाळी सातारा येथील पोवई नाक्यावर उघडकीस आला. विसावा नाका येथुन काही युवकांनी या एस.टी.चा पाठलाग करून संबंधित कर्मचाऱ्यांचे पितळ उघड पाडल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने माफीनामा दिला.
सातारा : कराड येथील विभागीय कार्यशाळेच्या कर्मचाऱ्याने चालक, वाहक नसलेल्या एस.टी. बस मधुन प्रवाशांची अनधिकृतपणे वाहतुक केल्याचा प्रताप आज सकाळी सातारा येथील पोवई नाक्यावर उघडकीस आला. विसावा नाका येथुन काही युवकांनी या एस.टी.चा पाठलाग करून संबंधित कर्मचाऱ्यांचे पितळ उघड पाडल्यानंतर त्या कर्मचाऱ्याने माफीनामा दिला.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कराड येथुन प्रवाशांनी खचाखच भरलेली एस. टी. बॉम्बे रेस्टॉरंट मार्गे सातारा बसस्थानकाकडे निघाली असता विसावा नाका येथे काही जणांनी एस.टी.ला हात करून थांबविण्याचा प्रयत्न केला असता ती न थांबता पोवई नाक्याच्या दिशेने सुसाट वेगाने जाऊ लागल्यामुळे काही युवकांनी त्या एस.टी. चा पाठलाग करून तिला पोवई नाका येथे थांबवले असता एसटीच्या स्टेरिंगवर विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी बसलेला आढळून आला. संबंधित युवकांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता विभागीय कार्यालयातील ड्युटी संपवुन संबंधित कर्मचारी वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नसताना एस. टी चालवत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संबंधित युवक आणि प्रवासी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी उडाल्या. प्रकरण अंगलट येण्याची शक्यता निर्माण होताच विभागीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्याने माफीनामा दिल्याची माहिती प्राप्त होत आहे. दरम्यान विनापरवाना प्रवासी वाहतुक करणाऱ्या कार्यशाळेच्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी एसटी चालक यांनी केली आहे.