वाहतूक पोलिसांच्या ‘दंड’गिरीने रिक्षाचालक हैराण
मिळवायचे 500 रुपये अन दंड 500 : जगायचे कसे हाच सवाल
कोरोनाचा कहर संपल्यानंतर जगरहाटी सुरु झाली मात्र तोपर्यंत एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप सुरु केलाय. त्यामुळे सातारा शहरात ग्रामीण भागातून येणारे तसेच बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असल्याने साताऱ्यातील रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडकळीस आलाय. मात्र, या स्थितीत देखील वाहतूक पोलिसांकडून रिक्षाचालकांना नो एन्ट्री तर कधी कोणत्याही कारणातून थेट 500 रुपयांचा दंड ऑनलार्इन त्यांच्या वाहनावर टाकला जात आहे.
सातारा : कोरोनाचा कहर संपल्यानंतर जगरहाटी सुरु झाली मात्र तोपर्यंत एस. टी. कर्मचाऱ्यांनी संप सुरु केलाय. त्यामुळे सातारा शहरात ग्रामीण भागातून येणारे तसेच बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमीच असल्याने साताऱ्यातील रिक्षाचालकांचा व्यवसाय मोडकळीस आलाय. मात्र, या स्थितीत देखील वाहतूक पोलिसांकडून रिक्षाचालकांना नो एन्ट्री तर कधी कोणत्याही कारणातून थेट 500 रुपयांचा दंड ऑनलार्इन त्यांच्या वाहनावर टाकला जात आहे. पण हा प्रकार म्हणजे दिवसभरात कसे तरी कमावयाचे 400 ते 500 रुपये दंडही 500 रुपये त्यामुळे रिक्षाचालकांनी जगायचे तरी कसे ? असा ते विचारत आहेत.
सातारा बसस्थानक परिसर, राजवाडा बसस्थानक परिसरात रिक्षाचालकांचे स्टॉप आहेत. केवळ खालचा रस्ता, वरचा रस्ता, राधिका रस्ता आणि आता वाढत गेलेली उपनगरे या परिसरात रिक्षाचालक व्यवसाय करत असतात. मध्यंतरी कोरोनाचा कहर वाढल्यानंतर रिक्षा व्यवसाय ठप्पच होता. त्यामुळे अनेकांचे बँकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. तर खासगी फायनान्सवाले रिक्षा ओढून नेत असल्याचे प्रकारही घडत आहेत.
लॉकडाऊनचा मोठा परिणाम सर्वच व्यवसायांवर झालेला असून रिक्षाचालक या आर्थिक फटक्यातून अद्याप सावरलेले नाहीत. त्यातून लॉकडाऊन शिथील केला तरी रिक्षात फक्त दोनच प्रवासी असे नियम काढून दंड केलाच जातो तर कधी नो एन्ट्रीतून आला तर बसस्थानक परिसरात प्रवासी सोडण्यासाठी रिक्षा थांबवली तरी देखील वाहतूक शाखेचे कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी हातात असलेल्या मशीनने वाहनाचा फोटो काढून दंडाची पावती मारत आहेत.
हा ऑनलाईन दंड वाहनावर पडला की तो कधी ना कधी भरावाच लागतो. नाही तर तो साठतच जात असतो. ही एक वेगळ्या प्रकारची दहशत वाहतूक पोलिसांनी सुरु केली आहे. पहिले चिरीमिरीत आवरणारे वाहतूक पोलीस आता थेट ऑनलार्इन दंड करत असून कधी कधी त्यांच्यातील इगो जागा झाला तर दंडाची रक्कम वाढतच जात असल्याच्या प्रकाराने दुचाकी चालकांसह रिक्षाचालक सध्या साताऱ्यात प्रचंड हैराण झालेले आहेत.
वास्तविक साताऱ्यात पार्किंगची बोंबाबोंब एवढी मोठी आहे की कधी कधी गडबडीत नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यास त्याचाही दंड वेगळा. दैनंदिन वाहतूक शाखेची क्रेन अशा प्रकारे हजारो रुपयांचा दंड वसूल करत असते. तर क्रेनवरील कर्मचाऱ्यांची बेशिस्तही सातारकर उघड्या डोळ्याने पाहत असतात. याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रारी जावून देखील त्यावर काहीही कार्यवाही होत नाही. एक प्रकारे ही पोलीस खात्याकडून शिस्तीऐवजी मग्रुरीच सुरु असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
रिक्षाचालकांचे असेही हाल
एकतर स्वत:ची रिक्षा असेल व चालवणारा स्वत: मालक असला तरी आता पहिल्या सारखा रिक्षा व्यवसाय साताऱ्यात राहिलेला नाही. वाहनांची संख्या वाढलेली आहे. तर अनेक बेरोजगार युवक दुसऱ्याची रिक्षा भाड्याने घेवून चालवत असतात व मालकाला शिप दिल्यावर 400 ते 500 रुपये कसेबसे कमवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून रिक्षाचालकांवर अन्यायकारक कारवाई होत असून 500 रुपये दंड वाहनावर ऑनलाईन पध्दतीने टाकण्यात येत असल्याने कमवायचे किती, दंड किती भरायचा आणि जगायचे कसे अशा प्रश्नांच्या जंत्रीत रिक्षाचालकांचे हाल सुरु आहेत.
पोलीस अधिक्षकांकडून कार्यवाही नाही
वाहतूक पोलीस शहरात नाक्यानाक्यावर वाहने अडवण्याचा उद्योग जोरदारपणे करत आहेत. असंख्य दुचाकी चालक, इतर मोठी वाहनांसह रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात ते व्यस्त असतात. मात्र, तोपर्यंत आजुबाजूला वाहतुकीची कोंडी होत असली तरी त्याकडे त्यांचे लक्ष नसते. वाहतूक पोलिसांना मुळात कागदपत्रे तपासण्याचे अधिकार आहेत की नाहीत हे पहिल्यांदा स्पष्ट करावे. कारण त्यांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नेमलेले असते की दंड गोळा करण्यासाठी हेही स्पष्ट झाले पाहिजे. आरटीअोला कागदपत्रे तपासण्याचा अधिकार आहे. त्यांनी ते काम करावे मात्र वाहतूक पोलिसांकडून सुरु असलेल्या या कारवाया थांबल्याच पाहिजेत अशी रिक्षाचालकांसह सातारकरांची मागणी असून पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी यात लक्ष घालून अन्यायकारक दंड वसुली थांबवावी, अशी मागणी होत आहे.


