अवैध वाळु उपशा प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
खटाव येथुन २६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; चारजण ताब्यात, एकजण फरार
खटाव, ता. खटाव गावच्या हद्दीत अवैध वाळु तस्करांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून ६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी करण राजेंद्र पाचागणे, कैलास अंकुश गलांडे, ओमकार धनाजी पाटोळे, निलेश बाळु मदने, सर्व रा. खटाव, ता. खटाव यांना ताब्यात घेण्यात आले असून खटाव येथीलच गणेश उर्फ रजनीकांत शंकर शिंदे हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
सातारा : खटाव, ता. खटाव गावच्या हद्दीत अवैध वाळु तस्करांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून ६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी करण राजेंद्र पाचागणे, कैलास अंकुश गलांडे, ओमकार धनाजी पाटोळे, निलेश बाळु मदने, सर्व रा. खटाव, ता. खटाव यांना ताब्यात घेण्यात आले असून खटाव येथीलच गणेश उर्फ रजनीकांत शंकर शिंदे हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमधील ही मोठी कारवाई समजली जात असून या कारवाईमुळे अवैध वाळु तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक अजय बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करांवर धडक कारवाई करण्याची सूचना सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पथकाचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दि. २४ रोजी बातमी डिसेंबर रोजी किशोर धुमाळ यांना त्यांच्या खास बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, खटाव, ता. खटाव गावच्या हद्दीत भराडे वस्ती परिसरात असणाऱ्या येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे किशोर धुमाळ यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्या पथकाला तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
दि. २५ डिसेंबर रोजी पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळालेल्या ठिकाणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकला असता त्याठिकाणी काहीजण जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने वाळु उपसा करून नदीपात्रात जवळ पाच ब्रास पेक्षा अधिक वाळुचा डेपो करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजेंद्र पाचागणे, कैलास अंकुश गलांडे, ओमकार धनाजी पाटोळे, निलेश बाळु मदने, सर्व रा. खटाव, ता. खटाव यांना ताब्यात घेतले असून खटाव येथीलच गणेश उर्फ रजनीकांत शंकर शिंदे हा फरार होण्यात यशस्वी झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी एक जेसीबी, वाळुने भरलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण २६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या कारवाईत पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, स. फौ. तानाजी माने, पोलीस हवालदार संतोष पवार, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, पो. ना. अमोल माने, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, स्वप्नील माने, शिवाजी भिसे, गणेश कापरे, पो. कॉ. स्वप्नील दौंड, प्रवीण पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख यांनी सहभाग घेतला.
गेल्या काही महिन्यांमधील सर्वात मोठी कारवाई
खटाव-माण तालुका हा जशी बुद्धीची खाण समजला जातो, त्याचप्रकारे या तालुक्यात अलिकडच्या काळात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येते. खटाव तालुक्यातील येरळा, तर माण तालुक्यातील माणगंगा या दोन नदीपात्रांमध्ये वाळू खनिज फार मोठ्या प्रमाणावर पहायला मिळते. त्यामुळे याठिकाणी सातत्याने छोट्या-मोठ्या वाळू तस्करांवर कारवाया होताना पहायला मिळतात. गेली दोन वर्षे कोरोनामुळे अनेक प्रतिबंध लावण्यात आल्यामुळे या दोन्ही नद्यांनी मोकळा श्वास घेतला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून काही अटी-शर्ती शिथिल करण्यात आल्याने माणगंगेसह येरळा नदीपात्रात छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा होवू लागला आहे. रात्रीच्या वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतानाही याची माहिती महसूल विभागाला नसेल, अशी शक्यता आजिबात वाटत नाही. याच दोन तालुक्यात अवैध वाळूउपशावरुन फार मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने या दोन तालुक्यांवर बारकाईने नजर ठेवल्यामुळेच गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने दि. 25 रोजी केलेली कारवाई सर्वात मोठी ठरली आहे.
पद्माकर घनवट ते किशोर धुमाळ...
स्थानिक गुन्हे शाखेमध्ये पद्माकर घनवट, राजेंद्र कुंभार, सर्जेराव पाटील यांनी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यानंतर या विभागाची सूत्रे किशोर धुमाळ यांनी हाती घेतली. किशोर धुमाळ हे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना त्यांनी सुरुची राडा प्रकरण अत्यंत कौशल्याने हाताळले होते. तद्नंतर त्यांची शाहूपुरी पोलीस ठाण्यातून शासकीय नियमानुसार बदली झाल्यानंतर त्यांनी काही दिवस कराड येथे कामकाज पाहिले. सर्जेराव पाटील यांची बदली झाल्यानंतर सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेसाठी अनेकजण इच्छुक असताना राज्य शासनाने त्यांच्याकडे सातारा स्थानिक गुन्हे शाखेची सूत्रे हाती दिल्यानंतर धुमाळ यांनी अनेक खुनांच्या घटनांचा उलगडा करीत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. अनेकांना तडीपार करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. स्थानिक गुन्हे शाखेत वेगवेगळ्या भूमिका बजावणार्या धुमाळ यांचे नेटवर्क पाहता त्यांच्याच नेतृत्यावाखाली गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर वाळू सम्राटांना चाप लावण्यात यश आले आहे.


