maharashtra

साताऱ्यात नाताळ सण उत्साहात साजरा


Celebrate Christmas in Satara
कोरोना आणि त्याच्या पाठोपाठ आलेल्या ओमायक्रॉन हे जागतिक महामारीचे संकट दुर कर अशी प्रार्थना आज ख्रिस्ती बांधवांनी येशुकडे करत साताऱ्यात नाताळ सण अत्यंत उत्साहात साजरा केला. पोवई नाका येथील टिळक मेमोरियल चर्च आणि सदरबझार येथे असणाऱ्या चर्चमध्ये आज दिवसभर ख्रिस्ती बांधवांनी येशुचा आशीर्वाद देण्यासाठी गर्दी केली होती.

सातारा : कोरोना आणि त्याच्या पाठोपाठ आलेल्या ओमायक्रॉन हे जागतिक महामारीचे संकट दुर कर अशी प्रार्थना आज ख्रिस्ती बांधवांनी येशुकडे करत साताऱ्यात नाताळ सण अत्यंत उत्साहात साजरा केला. पोवई नाका येथील टिळक मेमोरियल चर्च आणि सदरबझार येथे असणाऱ्या चर्चमध्ये आज दिवसभर ख्रिस्ती बांधवांनी येशुचा आशीर्वाद देण्यासाठी गर्दी केली होती. शहरातील गिफ्ट कलेक्शन आणि विविध बेकरीपुढे उभे असलेली सांताक्लॉजच्या वेशातील मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
तब्बल दोन वर्षानंतर सातारा शहरात शनिवारी ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण अत्यंत भक्तिभावात साजरा करण्यात आला. पोवई नाका येथे असणाऱ्या टिळक मेमोरियल चर्चवर बुधवारी रात्रीच आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.  आज सकाळी नऊ वाजल्यापासून या चर्चमध्ये येशूची प्रार्थना करण्यासाठी आणि फादर्स यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ख्रिस्ती बांधवांनी गर्दी करण्यास सुरू केली होती . दुपारी बारा वाजता या चर्चमध्ये ख्रिश्चन बांधवांनी येशुकडे सामुहिक प्रार्थना केली. जगामध्ये कोरोनानंतर ओमायक्रॉन ही महामारी डोके वर काढू लागल्यामुळे या महामारीचे संकट दुर कर, जगात सर्वत्र शांतता नांदू दे... अशी प्रार्थना ख्रिस्ती बांधवांनी केली.
जिल्हा रुग्णालय, सदरबझार, वाढेफाटा या परिसरात वास्तव्य करणार्‍या ख्रिस्ती बांधवांनी सदरबझार येथील अमेरिकन चर्चमध्ये प्रार्थना केली. यावेळी अनेक ख्रिस्ती बांधवांनी आपले मनोगत मनोगत व्यक्त करत सर्वांच्या अडचणी दूर करण्याची याचना  येशुकडे केली.
कोरोनामुळे गेले दोन वर्ष नाताळ सण साजरा करण्यावर अनेक मर्यादा आल्या होत्या. मात्र आता परिस्थिती बदलल्यामुळे दोन वर्षानंतर नाताळ सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गिफ्ट कलेक्शन, नामवंत बेकरी यांच्यासमोर सांताक्लॉजच्या वेशातील मुलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. लहान मुलांना विविध चॉकलेट, कॅडबरी देऊन सांताक्लॉजच्या वेशातील मुलांनी नाताळ सणाचा आनंद द्विगुणित केला.