महाबळेश्वर शहरात आज 13 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामध्ये पालिकेचे नाक्यावरील कर्मचारी, स्वच्छता विभागाच्या काही कर्मचार्यांचा समावेश आहे. आजअखेर शहरातील बाधितांची संख्या 184 झाली असून, 58 जण कोरोनामुक्त आहेत तर महाबळेश्वर तालुक्यात आजअखेर 375 कोरोनाबाधित असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे कोरोनाच्या महामारीत विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकर्यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
‘शहर व परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटींना अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा व कायद्याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील,’ असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.
शहरात आज 32 कोरोना रुग्णांची भर पडली असून, यामध्ये पालिकेतील 7 कर्मचार्यांचा समावेश असल्याने पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. 32 रुग्णांमुळे शहराची कोरोना रुग्णांची शतकाकडे तर तालुक्याची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पालिका कर्मचार्यांच्यामुळे पालिकेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
महाबळेश्वर तालुक्यातील भूमिपुत्रांना कोरोना साथीच्या काळात राष्ट्रीय हरित लवाद, सर्वोच्च न्यायालय व जीपीएसने केलेल्या मोजणीचा संदर्भ देत तालुक्यातील भूमिपुत्रांना बांधकामे काढून घेण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोना साथीच्या प्रादुर्भावाने हैराण नागरिकांना वनक्षेत्रपाल, महाबळेश्वर यांनी नोटिसा बजावून नेमकी वेळ साधल्याने भूमिपुत्रांमध्ये अस्वस्थता आहे.
गोडवली, ता. महाबळेश्वर येथील कोरोना परिस्थिती पाहता शासनाने लागू केलेला कंटेन्मेंट झोन तब्बल महिन्याभराने आज शिथिल करून बाधित रुग्णाच्या घराजवळचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करून गावकर्यांना दिलासा दिला आहे.
शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीचा वेग वाढवण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणी पालिकांनी वॉर्डनिहाय आशा सेविकांची नेमणूक करावी,’ अशी सूचना आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर तालुका आढावा बैठकीत केली.