महाबळेश्वर शहरातील 32 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
बाधितांमध्ये पालिकेच्या सात कर्मचार्यांचा समावेश; पालिका कामकाज काही दिवस बंद
शहरात आज 32 कोरोना रुग्णांची भर पडली असून, यामध्ये पालिकेतील 7 कर्मचार्यांचा समावेश असल्याने पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. 32 रुग्णांमुळे शहराची कोरोना रुग्णांची शतकाकडे तर तालुक्याची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पालिका कर्मचार्यांच्यामुळे पालिकेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
महाबळेश्वर : शहरात आज 32 कोरोना रुग्णांची भर पडली असून, यामध्ये पालिकेतील 7 कर्मचार्यांचा समावेश असल्याने पालिका प्रशासन चांगलेच हादरले आहे. 32 रुग्णांमुळे शहराची कोरोना रुग्णांची शतकाकडे तर तालुक्याची द्विशतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे. पालिका कर्मचार्यांच्यामुळे पालिकेचे कामकाज काही दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी स्कूल मोहल्ला व पालिका कर्मचार्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या तपासणीचा अहवाल बुधवारी रात्री उशिरा पालिका प्रशासनाच्या हाती आले. अहवाल पाहता महाबळेश्वर शहराला कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होताना दिसत आहे. एकाच दिवशी 32 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पालिकेतील सात कर्मचारी व स्कूल माहेल्ला येथील 23 नागरिकांचा समावेश आहे. तर बुधवारी सकाळी शहरातील दोन जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने एकाच दिवशी शहरात 32 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
पालिकेतील अनेक कर्मचारी शहरात घरोघरी जाऊन लोकांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या पूर्वीच्या आजाराची नोंद घेत होते. सध्या पालिकेने घरोघरी होमिओपॅथीच्या अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वितरण सुरू केले होते. यातील सात कर्मचार्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांच्या चिंतेत चांगलीच भर पडली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमुळे शहरात प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येत वाढ होणार आहे तसेच पालिकेतील एकूण 288 कर्मचार्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या तपासणीचे अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत पालिकेचे कामकाज बंद करण्याचा निर्णय आज पालिका प्रशासनाने घेतला आहे. स्वॅब घेण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केल्यामुळे आज शहरात घंटागाडीची सेवा बंद करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहर निर्जंतुक करण्याचे काम हाती घेण्यात आले असले तरी येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे. पावसामुळे केलेली औषध फवारणी पाण्याबरोबर वाहून जात असल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे.
पालिकेतील सात कर्मचार्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या कर्मचार्यांच्या संपर्कात आलेले पालिकेचे अधिकारी हे देखिल हाय रिस्कमध्ये येतात तसेच या अधिकार्यांच्या संपर्कात आल्याने येथील काही नगरसेवकही लो रिस्क यादीत येतात. पालिकेतील ज्या कर्मचार्यांकडे सोय आहे. त्यांना होम आयसोलेशनमध्ये जाण्याची सूचना पालिका प्रशासनाने केली आहे. परंतु, ज्यांच्याकडे सोय नाही अशा कर्मचार्यांची येथील कोरोना केअर सेंटरमध्ये सोय करण्यात आली आहे. आज पुन्हा पालिकेतील कर्मचार्यांचे स्वॅॅब घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील मोठ्या संख्येने कर्मचार्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर त्या सर्वांची सोय कोरोना केअर सेंटरमध्ये करणे जागे अभावी कठीण होईल, ही बाब लक्षात घेता कर्मचार्यांना एका हॉटेलमध्ये आयसोलेशन करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
आज शहरातील एका प्रतिबंधित क्षेत्रातील एका व्यक्तीचे हृदय विकाराने निधन झाले. प्रतिबंधित क्षेत्र असल्याने येथील लोकांना अंत्यसंस्कारासाठी बाहेर येता येणार नाही म्हणून शासनाच्या नियमाप्रमाणे पालिकेच्यावतीने त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दरम्यान, या व्यक्तीची कोरोना चाचणी घेण्यात आली होती व ती निगेटिव्ह आली होती, असेही पालिका प्रशासनाने सांगितले.