बाधित रुग्णाचा परिसर शिथिल करून मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू

गोडवली गावकर्‍यांना मिळाला दिलासा

गोडवली, ता. महाबळेश्‍वर येथील कोरोना परिस्थिती पाहता शासनाने लागू केलेला कंटेन्मेंट झोन तब्बल महिन्याभराने आज शिथिल करून बाधित रुग्णाच्या घराजवळचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करून गावकर्‍यांना दिलासा दिला आहे.

पाचगणी : गोडवली, ता. महाबळेश्‍वर येथील कोरोना परिस्थिती पाहता शासनाने लागू केलेला कंटेन्मेंट झोन तब्बल महिन्याभराने आज शिथिल करून बाधित रुग्णाच्या घराजवळचा परिसर मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करून गावकर्‍यांना दिलासा दिला आहे.
11 जुलै रोजी एका संशयित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर गोडवली गावात प्रांताधिकार्‍यांनी कंटेन्मेंट झोन लागू केला आणि अख्खं गाव लॉकडाऊन झालं. त्यानंतर एक-एक करीत गावात कालपर्यंत तबब्ल 40 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर एक मृत झाला. गावात 257 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढतच गेला आणि गावकर्‍यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पाचगणी जवळ असल्याने बहुतांशी नागरिक या ठिकाणी रोजीरोटीसाठी कामाला असतात. त्यामुळे गाव बंद झाल्याने बर्‍याच जणांचे हाल झाले. जनजीवन ठप्प झाले होते.
दिवस वाढू लागल्याने ग्रामस्थांनी आ. मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे व राजेंद्रशेठ राजपुरे यांना कंटेन्मेंट झोन उठवण्याबाबत साकडे घातले. या सर्वांनी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर व तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्याशी चर्चा केली व गावची भौगोलिक परिस्थिती पाहता मायक्रो कंटेन्मेंट झोनबाबत प्रस्ताव बनवला व काल रात्री उशिरा याबाबत नोटीस बजावण्यात आली त्यामुळे ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला.
आज सकाळी बाळासाहेब भिलारे, राजेंद्रशेठ राजपुरे, सपोनि सतीश पवार, प्रवीण भिलारे, गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी गोडवली गावाला भेट दिली. 
यावेळी बोलताना बाळासाहेब भिलारे म्हणाले, ‘सुरुवातीला आपला तालुका झिरो होता, प्रत्येक गावाने जबाबदारीने आपली गावे सुरक्षित ठेवली पण मुंबई पुणेकरांच्या प्रवेशाने प्रश्‍न निर्माण झाला असला तरी गोडवलीकरांच्या थोड्याशा चुकीमुळे ही परिस्थितीत ओढवली. नागरिकांनी यापुढेही काळजी घ्यावी.’ 
राजेंद्रशेठ राजपुरे म्हणाले, ‘लॉकडाऊन उठलं रे’ या आविर्भावात राहू नये. कोरोनाचा धोका कमी झाला नसून तो अधिक वाढत आहे. जरी गावाच कंटेन्मेंट झोन मायक्रो झाला असला तरी धोका वाढला आहे. काळजी व जबाबदारीही वाढली असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामसेवक आर. व्ही. चव्हाण, सरपंच सुरेश मालुसरे, माजी सरपंच अंकुश मालुसरे, संतोष चोरगे, आर. डी. मालुसरे, संदीप मालुसरे, नामदेव मालुसरे, हनमंत मालुसरे यांची उपस्थिती होती.