वैद्यकीय तपासणीसाठी महाबळेश्वर व पाचगणी पालिकांनी आशा सेविकांची नेमणूक करावी
आ. मकरंद पाटील यांच्या महाबळेश्वर कोरोना आढावा बैठकीत सूचना
शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीचा वेग वाढवण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणी पालिकांनी वॉर्डनिहाय आशा सेविकांची नेमणूक करावी,’ अशी सूचना आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर तालुका आढावा बैठकीत केली.
महाबळेश्वर : ‘शहरातील नागरिकांच्या वैद्यकीय तपासणीचा वेग वाढवण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणी पालिकांनी वॉर्डनिहाय आशा सेविकांची नेमणूक करावी,’ अशी सूचना आ. मकरंद पाटील यांनी महाबळेश्वर तालुका आढावा बैठकीत केली.
कोरोना पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तालुक्याचा आढावा घेण्यासाठी हिरडा विश्राम गृहावर आ. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बाळासाहेब भिलारे, तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कदम, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, उपसभापती संजय गायकवाड, गटविकास अधिकारी नारायण घोलप आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार चौधरी-पाटील म्हणाल्या, ‘आजअखेर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 152 झाली आहे. यापैकी 62 रुग्णांवर उपचार सुरू असून, 82 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजअखेर कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 152 रुग्णांमध्ये बेल एअर येथे थेट मुंबईवरून आलेल्या रुग्णांचाही समोवश आहे.’
तसेच मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी शहरातील नागरिक वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य करीत नसल्याचे सांगितले.
तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी तालुक्याचा आढावा मांडताना रुग्णवाहिकांची कमतरता भासते तसेच रात्री एखादा रुग्ण आला तर त्याचा स्वॅब सकाळी घेण्यात येतो, तोपर्यंत रुग्ण दाखल करून घेण्याची सोय महाबळेश्वर तालुक्यात नाही. ती सोय बेल एअरमध्ये झाली तर लोकांना याचा फायदा होईल, असे सांगितले.
गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी ग्रामीण भागातील लोकांना अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. रोज वाफ, काढा व हळद दूध घेण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती दिली.
महाबळेश्वर, वाई व खंडाळा या तीन तालुक्यांसाठी तीन रुग्णवाहिका मिळाव्यात, अशी मागणी पालकमंत्री ना. बाहासाहेब पाटील यांच्याकडे केल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली.
ज्या भागातील लोक वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य करीत नाही, त्या भागातील लोकप्रतिनिधींनी लोकांना याबाबत जनजागृती करावी व सहकार्य करण्यास तयार करावे. तालुक्यातील लोकांच्या तपासणीचा वेग वाढवण्याची आवश्यकता असून, बेल एअरमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध केले पाहिजे, असे मत आ. मकरंद पाटील यांनी व्यक्त केले.
रांजणवाडी येथे 2 ऑगस्टपासून रुग्ण आढळला नाही, याचा अर्थ गोडवलीची साखळी खंडित झाली, असे म्हणता येईल. तेथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करण्याची सूचनाही आ. पाटील यांनी या बैठकीत केली.
या बैठकीत बाळासाहेब भिलारे, राजेंद राजपुरे, संजय गायकवाड, नगरसेवक नासीर मुलाणी यांनीही चर्चेत भाग घेतला. तालुक्याला जंतुनाशके, मास्क, पीपीई कीट, हातमोजे, औषधे, इंजेक्शन आदी उपलब्ध आहेत का? याची माहिती घेऊन आ. पाटील यांनी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, त्याचा पुरवठा करण्याबाबत आपण खबरदारी घेऊ, असे आश्वासन त्यांनी या बैठकीत दिले.
या बैठकीला डॉ. राजीव शहा, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी, अॅड. संजय जंगम, प्रवीण भिलारे, दत्ताजी वाडकर, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, नगरसेवक संदीप साळुंखे, प्रकाश पाटील, विशाल तोष्णीवाल, तौफिक पटवेकर, इरफान शेख, रोहित ढेबे, संदीप मोरे, सुनील पार्टे, गणेश ढेबे आदी मान्यवर उपस्थित होते.