जागतिक अजिंक्यपद विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला आगामी ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सहज मजल मारण्याची संधी आहे. अनुभवी सायना नेहवालला मात्र पहिल्या फेरीतच कडव्या प्रतिस्पर्धीचा सामना करावा लागणार आहे.

टोक्यो ऑलिम्पिकच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ही स्पर्धा 17 ते 21 मार्चदरम्यान होणार असून ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या सिंधूची पहिल्या फेरीत मलेशियाच्या सोनिया चियाशी गाठ पडणार आहे. सिंधूने अपेक्षेनुसार कामगिरी केल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिला अकाने यामागुची, तर उपांत्य फेरीत कॅरिलोना मारिनचा सामना करावा लागू शकतो. सायनासमोर मात्र डेन्मार्कच्या मिआ ब्लिचफेल्डचे आव्हान असेल.
पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यपला पहिल्याच फेरीत क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या जपानच्या केन्टो मोमोटाविरुद्ध झुंज द्यावी लागणार आहे. किदम्बी श्रीकांतचा सलामीचा सामना इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआटरेशी होईल, तर एच. एस. प्रणॉयलचा मलेशियाच्या ल्यू डॅरेनशी दोन हात करावे लागतील.
पुरुष दुहेरीत भारताच्या दोन जोडया सहभागी होणार आहेत. तर महिला आणि मिश्र दुहेरीत भारताच्या प्रत्येकी तीन जोडया खेळतील. ऑल इंग्लंड स्पर्धेपूर्वी 3 मार्चपासून स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची कामगिरीदेखील ऑलिम्पिक पात्रतेसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.