sports

बाप्पांच्या स्वागताची लगबग सुरू 

सातारच्या बाजारपेठा सजावटीच्या साहित्याने सजल्या

विघ्नहर्ता बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठेत श्रींच्या समोर सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. कोरोना संकटातही भाविकांची उत्साहात खरेदी सुरू होती.

सातारा : विघ्नहर्ता बाप्पांचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बाजारपेठेत श्रींच्या समोर सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. कोरोना संकटातही भाविकांची उत्साहात खरेदी सुरू होती. 

यंदा कोरोना महामारीने जवळपास अर्धे वर्ष खाऊन टाकले आहे. कोरोना अद्यापही ठाण मांडून बसला आहे. गुढीपाडव्यापासून ते श्रीकृष्ण जन्माष्टमी पर्यंत सर्व सण साजरे करताना लोकांना मर्यादा आल्या आहेत. याच कोरेानाच्या सावटात विघ्नहर्त्या गणरायांचे शनिवारी आगमन होत आहे. त्यामुळे समस्त भाविक लाडक्या बाप्पांच्या स्वागताला लागले आहेत. त्यामुळे सजावटी लागणार्‍या साहित्याच्या खरेदीसाठी साताराचा मोती चौक, 501 पाटी, राजपथ, राजवाडा परिसर फुलून गेला आहे.
गणरायाची आरास करण्यासाठी कागदी व कापडी फुलांच्या माळा, मखमली टिकली वर्कचे पडदे आणि कापडी मांडव, कागदी आसने, मंदिरे व फुलोरा, गणरायासाठी छत्र तसेच पेशवाई, पुणेरी आणि शिंदेशाही पगड्या उपलब्ध आहेत. कापडी मंडप व स्क्रीन पेंटिंगची आसने आणि तरंगते दिवे, रांगोळी आदी साहित्य विक्रीस आहे. तसेच विविध प्रकारच्या फुलांच्या आकर्षक माळा, मखरे, झुंबरे, पूजा साहित्य, पडदे बाजारपेठेत उपलब्ध आहे.

विद्युत रोषणाईसाठी विविध आकर्षक विद्युत दिव्यांच्या माळा, बाजारपेठेतील दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी नागरिकांची वर्दळ सुरू आहे. एलईडी इंडियन, एलईडी माळा, डमरू माळ, चेरीलाइट अशा माळाही उपलब्ध आहेत. चीनच्या वस्तूंकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत असून, अनेक विक्रेत्यांनी चायनीज माल विक्रीसही ठेवलेला नाही तसेच आकर्षक कागदी मखरे, फायबर मखरे, गौरीकमळ, फुलोरा, सिंहासन यांना नेहमीप्रमाणे मागणी असून, 200 रुपयांपासून 4 हजार रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. 

गौरी सजावटीचा ट्रेंड गेल्या काही वर्षात रुजल्याने गौरींचे विविध प्रकारचे मुखवटे, साड्या आणि विविध प्रकारचे दागिनेही उपलब्ध आहेत. पुजा-अर्चा करण्यासाठी विविध सुगंधी अगरबत्ती, धूप, कापसाच्या वाती, सत्यनारायण पुजेचे पुडे अशा अनेक साहित्य खरेदीसाठी लगबग दिसून येत होती.  
थर्माकॉलवर बंदी असल्याने थमॉकॉलचे रेडिमेड मखरा जागा कापडी मखरांनी घेतल आहे. बाजारपेठेत नागरिक सोशल डिस्टन्सचे भान राखत असले तरी प्रशासनाने यावर लक्ष देण्याची गरज आहे. 
बाप्पांचे आगमन झाल्यानंतर दोनच दिवसांत गौराईंचे आगमन होत असते. त्यासाठी गौराइेंचे मुखवटे, आरासीचे साहित्य दुकानांमध्ये दिसू लागले आहे.