sports

सातार्‍यात आधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्र साकाणार

खा. उदयनराजे भोसले यांची माहिती : दिल्लीत लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची घेतली भेट

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सातारची भूमी ही शहिदांची भूमी आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या संख्येने लष्करी सेवेचा वारसा जपणार्‍या गावांपैकी सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी शेकडो जवान देशसेवेसाठी राष्ट्राला अर्पण केले आहेत. याच सातारच्या भूमीवर लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी लष्कराची छावणी उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. याच पार्श्‍वभूमीवर खा. उदयनराजे यांनी दिल्ली येथे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची भेट घ

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या सातारची भूमी ही शहिदांची भूमी आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या संख्येने लष्करी सेवेचा वारसा जपणार्‍या गावांपैकी सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी शेकडो जवान देशसेवेसाठी राष्ट्राला अर्पण केले आहेत. याच सातारच्या भूमीवर लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी लष्कराची छावणी उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणे शक्य असल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. याच पार्श्‍वभूमीवर खा. उदयनराजे यांनी दिल्ली येथे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. 

या भेटीत खा. उदयनराजे यांनी लष्करप्रमुख नरवणे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा खास भेट म्हणून दिली. 

खा. उदयनराजे भोसले यांनी लष्कर प्रमुखांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. सातारा जिल्हा हा सैनिकांचा असून, जिल्ह्यातील अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात लष्कराचे आधुनिक प्रशिक्षण देणारी छावणी उभारली गेली तर ती जवानांच्या शौर्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असेल. ही छावणी जिल्ह्यातील तरुणांना प्रेरणा देणारी असेल. लष्कराच्या छावणीला पोषक असे वातावरण आणि सुविधा असल्यामुळे लष्कराकडून याचा नक्की विचार केला जाईल, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली.

लष्करी छावणीसाठी तसेच आधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी आवश्यक असणार्‍या पायाभूत सुविधा या सातारची भूमीत आयत्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्टेशन, राष्ट्रीय महामार्गासह रस्त्याचे जाळे, मुबलक जमीन आणि पाणी यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सैनिकांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गड-किल्ले हे सुद्धा प्रेरणादायी आहेत. तसेच लष्करी छावणीला आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही, असेही खासदार उदयनराजे यांनी सांगितले. 

खा. उदयनराजे म्हणाले, ‘सैनिकांच्या या जिल्ह्यात छावणी उभारली गेली तर ती नव्या पिढीला प्रेरणादायी असेल. तसेच ती अभिमानाची गोष्ट असेल. या छावणीच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जतन करता येईल. तसेच या छावणीमुळे जिल्ह्यातील तरुणांना आणि शेतकर्‍यांना व्यवसाय अथवा रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. ही छावणी सातारच्या वैभवात मोठी भर घालेल,’ असेही खा. उदयनराजे यांनी सांगितले.