जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपले
मांढरदेवी घाटात दरड कोसळली ः सातारा शहरात रस्त्यावर पाणीच पाणी; ओढे-नाले तुडुंब; नागरिकांची तारांबळ
सातारा जिल्ह्याला गुरुवारी धुवाँधार पावसाने झोडपून काढले. श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने संपूर्ण जिल्हा चिंब झाला आहे. दरम्यान, मांढरेदवी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
सातारा : सातारा जिल्ह्याला गुरुवारी धुवाँधार पावसाने झोडपून काढले. श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने संपूर्ण जिल्हा चिंब झाला आहे. दरम्यान, मांढरेदवी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
जुन व जुलै कोरडे गेल्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून धूवाँधार पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत. सातारा शहरात गुरुवारी सकाळपासून संततधार सुरू असल्याने जनजीवन ठप्प होण्याची वेळ आली आहे. मुसळधार पावसाने राधिका रोड, बसस्थानक परिसर, जुना आरटीओ चौक यासह अनेक भागात रस्त्यावर पाणी साचले. सातारा परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
कास-बामणोली भागात पावसाची जोरदार हजेरी
कुडाळ : जावळी तालुक्यामध्ये बामणोली, कास विविध भागांत पावसाचा जोर वाढला आहे. जावळी परिसरात बुधवारी गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत जावलीत 786.91 मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली होती. त्यामध्ये जावळी तालुक्यामध्ये एकूण आनेवाडी 24 तासांत 492.62 मिमी, कुडाळ 709.10, बामणोली 2019.44, केळघर 893.92, करहर 734.70 अशी एकूण आजचे 5636.79 मिलिमीटर पावसाची नोंद जावळी तालुक्यात झाली आहे. दोन दिवसापासून जावळी तालुक्यात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढल्याने जावळी तालुक्यातील वेण्णा, कुडाळी नदी तसेच जावळी तालुक्यातील महू व हातगेघर धरणामध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसामुळे कुडाळ, मेढा, करहर, सायगाव, आनेवाडी, आलेवाडी, गांजे, मोहाट, केळघर, रांजणी, महू, हातगेघर, दरे बुद्रुक, मरड मुरे, रेडी मुरेसह जावलीच्या डोंगर दर्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. डोंगराच्या सात किलोमीटर परिसरात ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस कोसळत असल्याने कुडाळी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर कुडाळ ते मेढा दरम्यान मालदेव घाटात डोंगर उतारावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना भूरळ पाडत आहेत.
वडूज परिसरात बंधारे भरून वाहिले
आज सकाळ पासून वडूज सह परिसरात पावसाची रिमझिम सुरू होती. आज दिवसभर पडणार्या पावसाने छोटे पथविक्रेते यांची तारांबळ उडाली होती. तर परिसरातील असलेले काही बंधारे भरून वाहत असताना दिसून आले. तर आज रात्री उशीरपर्यंत पावसाचा जोर कायम होता.
मांढरदेवी घाटात दरड कोसळली
सातार्यातील मांढरदेवी (ता. वाई) घाटात गुरुवारी सकाळी दरड कोसळली. यामुळे दोन तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळताच यद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. सकाळी अकरा वाहतूक सुरळीत करण्यात आली.
मुसळधार पावसामुळे मांढरदेव घाटात गुरुवारी सकाळी भली मोठी दरड कोसळली. घाटातील मोठ-मोठाले दरड रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला होता. सुदैवाने ही घटना घडताना तिथून कुठलेही वाहन ये-जा करत नसल्याने मोठा अपघात टळला होता. मात्र दरड कोसळल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती. मांढरदेव येथून सकाळी घाट उतरून वाई एमआयडीसीत कामाला येणारे चाकरमानी व दुध विक्रेते आदींच्या वाहने अडकून पडली होती. वाई-मांढरदेव घाटात कोचळेवाडी गावच्या हद्दीत ही दरड कोसळली. याची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या श्रीपाद जाधव व त्यांच्या टीमने तीन तासाच्या अथक प्रयत्नातून रस्ता मोकळा करीत वाहतूक सुरळीत केली. सध्या पडत असलेल्या प्रचंड पावसामुळे मांढरदेव घाटात दरडी कोसळण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने वाहन चालकांनी शक्यतो या घाटातून प्रवास टाळावा असे, आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
फलटणला रिमझीम सरी
फलटण तालुक्यातही रिमझिम सरी बरसल्या. फलटण शहरासह तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधून-मधून सरी कोसळत होत्या. सायंकाळी दमदार पाऊस झाला.
माण तालुक्याला पावसाची हुलकावणी
जिल्ह्याच्या पश्चिम भागात धूवाँधार सुरू असताना पूर्वेकडे मात्र, माण तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली आहे. तालुक्यातील शेतकर्यांनी पावसाच्या भरोशावर पेरण्या उरकून घेतल्या. मात्र, पावसाने ओढ दिल्याने पिके कोमेजून जाण्याची शक्यता आहे.


