डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रगल्भ विचारांचे व्यक्तिमत्त्व
डॉ. विठ्ठल शिवणकर यांचे प्रतिपादन; छ. शिवाजी कॉलेजमध्ये झूम मीटिंगद्वारे शिक्षक दिन संपन्न
‘शिक्षक म्हणजे शुद्ध जीवन, शिक्षक म्हणजे संयमी व्यक्तिमत्त्व, हृदयापासून शिकवणारे शिक्षक झाले पाहिजेत. चांगल्या शिक्षकाने संयमी झाले पाहिजे आणि महात्मा गांधींचा आदर्श ठेवला पाहिजे. डॉ. राधाकृष्णन हे प्रगल्भ विचारांचे व्यक्तिमत्त्व होते.
सातारा : ‘शिक्षक म्हणजे शुद्ध जीवन, शिक्षक म्हणजे संयमी व्यक्तिमत्त्व, हृदयापासून शिकवणारे शिक्षक झाले पाहिजेत. चांगल्या शिक्षकाने संयमी झाले पाहिजे आणि महात्मा गांधींचा आदर्श ठेवला पाहिजे. डॉ. राधाकृष्णन हे प्रगल्भ विचारांचे व्यक्तिमत्त्व होते. शिक्षण धर्म आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आजच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांचा चेहरा नीट वाचला पाहिजे, त्यावेळी जाणीव निर्माण होईल, आपली शिक्षक हीच सर्वोत्कृष्ट प्रतिष्ठा आहे,’ असे विचार रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी व्यक्त केले.
छ. शिवाजी महाविद्यालयाच्या स्टाफ वेलफेअर विभागाने झूम मीटिंगद्वारे शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शिक्षकाच्या विषयी शिक्षण तज्ज्ञांची मते व्यक्त करताना ते पुढे म्हणाले, ‘जे. कृष्णमूर्ती नावाचे शिक्षण तज्ज्ञ होऊन गेले, त्यांनी शिक्षकांच्या बाबतीत मत व्यक्त करताना म्हटले आहे की, शिक्षकाने ऐहिक महत्त्वाकांक्षा ठेवू नये. असे झाले तर समाज हा शिक्षकास गुलाम करेल. शिक्षकाने आंतरिकदृष्ट्या समृद्ध असले पाहिजे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करावे. शिक्षकाने संतापी असता कामा नये. त्याची वर्तणूक चांगली असली पाहिजे. समाजातला कोणत्याही स्तरातला माणूस असला तरी त्याच्याबद्दल सद्भावना असावी. कुड्तोजी गुजर हे वाघासारखे होते पण संतापाच्या भरात ते स्वराज्यासाठी हुतात्मा झाले.शिक्षकाने रागावर नियंत्रण ठेवावे. बॅ. पी. जी. पाटील हे उत्तम शिक्षक होते, त्यांचा वारसा आपण जपायला हवा.’
महात्मा जोतिराव फुले, बहिणाबाई यांची भाषा शुद्ध नव्हती, असा काहींनी गवगवा केला; पण त्यांचे जगणे शुद्ध होते म्हणून त्यांचा आदर्श देखील लोकांनी घ्यावा. सोशल मीडियावर जोतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या पोस्ट प्रसारित होत असल्याचे सांगून शिक्षक म्हणून त्यांच्या कार्याची आठवण आपण ठेवायलाच हवी. माणूस मर्त्य आहे. आपण साधे शिक्षक आहोत. आपले वर्तन संयमित, शुद्ध आणि ज्ञानी असेल तर अशा शिक्षकापुढे शिक्षण देखील झुकेल.
या कार्यक्रमाला प्रा. डॉ. सुरेश झोडगे, डॉ. अनिल वावरे, डॉ. अरुणकुमार सकटे, तानाजी सपकाळ, प्रा. संजय महाडिक, डॉ. संपतराव पिंपळे, विजयसिंह घोरपडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
स्टाफ वेलफेअर विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. अनिसा मुजावर यांनी आभार मानले.


