sports

‘सिव्हिल हॉस्पिटल’च्या आवारात अस्ताव्यस्त पार्किंगचा बोजवारा

सुरक्षारक्षक अन् नागरिकांमध्ये घडताहेत वादाच्या घटना : पार्किंग निश्‍चित केलेल्या ठिकाणी लावणे गरजेचे

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार्किंग निश्‍चित केले असतानाही रुग्णालयात कामानिमित्त आणि नातेवाइकांना भेटायला येणार्या नागरिकांकडून वाहनांचे अस्ताव्यस्त  पार्किंग केले जात असल्यामुळे सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगची समस्या कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.

सातारा : जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार्किंग निश्‍चित केले असतानाही रुग्णालयात कामानिमित्त आणि नातेवाइकांना भेटायला येणार्या नागरिकांकडून वाहनांचे अस्ताव्यस्त  पार्किंग केले जात असल्यामुळे सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगची समस्या कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करून घेण्यासाठी जिल्ह्यातून रोज शेकडो रुग्ण येत असतात. उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक येत असतात. आजारपणाची बिले मंजूर करून घेण्यासाठी शासकीय कर्मचार्यांची नेहमी वर्दळ असते. रुग्णालयात शंभरपेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सेस, सफाई कामगार, सुरक्षा रक्षक काम करतात. 

या सर्वांसाठीच जिल्हा रुग्णालयातील आवारात तीन प्रशस्त पार्किंग निश्‍चित करण्यात आली होती. 
रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर, जुन्या अतिदक्षता विभागाच्या प्रवेशद्वाराबाहेर आणि शवविच्छेदन केंद्राच्या शेजारी पार्किंग तळ निर्माण करण्यात आले आहेत. त्यामध्ये दुचाकी-चारचाकी वाहने पार्किंग केली जातात. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारानजीक वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्यांसाठी पार्किंग निश्‍चित करण्यात आले आहे. या तीन पार्किंग तळापैकी एका पार्किंगमध्ये निम्म्या जागेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर उभारण्याचे काम सध्या सुरू आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणार्या मुख्य मार्गावर दुचाकी, चारचाकी वाहने नेहमी पार्किंग केलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. या वाहनांचा रुग्णवाहिकांना सातत्याने अडसर होत आहे. सुरक्षारक्षकांनी वारंवार सांगूनही वाहन चालक मनमानीपणे अस्ताव्यस्त् पार्किंग करत असल्यामुळे वाहन चालक आणि सुरक्षारक्षक यांच्यात सातत्याने वादावादीचे प्रकार होत आहेत. 

अनेकदा हे वाद हातघाईवर येऊन ठेपत आहेत. दुसरीकडे रुग्णालयात काम करणार्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांसाठी निश्‍चित केलेल्या पार्किंगमध्ये अन्य वाहनचालक आपली वाहने पार्किंग करताना दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आवारातील पार्किंगला अक्राळ-विक्राळ स्वरूप प्राप्त होत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने शिस्त पाळून निश्‍चित केलेल्या पार्किंगमध्ये वाहने पार्किंग करावीत, अशी मागणी या निमित्ताने उपस्थित होऊ लागली आहे.