sports

वाढीव वीजबिलासंदर्भातील नागठाणे येथील स्वाभिमानीच्या आंदोलनास स्थगिती

सपोनि डॉ. सागर वाघ यांची यशस्वी शिष्टाई : मागण्या मान्य न झाल्यास पुढील आंदोलनाची धार वाढविण्याचा इशारा

महावितरणकडून सध्या सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्वच थकीत वीजबिलापोटीच्या अन्यायकारक वसुलीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागठाणे (ता. सातारा) येथे बुधवारी वीज वितरण कंपनीविरोधात होणार्‍या आक्रोश मोर्चास काही कालावधीसाठी स्थगिती देण्यात आली. बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांनी वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात बैठक घडवून आणली. विहित कालावधीत विद्युत विभाग शासन दरबारी मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे वीज कनेक्शन तोडणार नाही, असे आश्‍वासन उपस्थित

नागठाणे : महावितरणकडून सध्या सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्वच थकीत वीजबिलापोटीच्या अन्यायकारक वसुलीबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नागठाणे (ता. सातारा) येथे बुधवारी वीज वितरण कंपनीविरोधात होणार्‍या आक्रोश मोर्चास काही कालावधीसाठी स्थगिती देण्यात आली. बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांनी वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्यात बैठक घडवून आणली. विहित कालावधीत विद्युत विभाग शासन दरबारी मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे वीज कनेक्शन तोडणार नाही, असे आश्‍वासन उपस्थित अधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

सध्या जिल्ह्यात वीज वितरणकडून औद्योगिक, कृषी, वाणिज्य व घरगुती अशा थकीत बिलापोटी वसुली मोहीम राबवण्यात आली असून, अनेक ठिकाणी संबंधितांची वीज कनेक्शन तडकाफडकी तोडण्यात आली आहेत. विद्युत कंपनीच्या या अन्यायकारक मोहिमेविरोधात संतप्त शेतकर्‍यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून नागठाणे (ता. सातारा) येथे जिल्हास्तरीय आक्रोश मोर्चाचे आयोजन बुधवारी सकाळी केले होते. या आक्रोश मोर्चास सातारा जिल्ह्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पाठिंबा दर्शविला होता.

दरम्यान, मंगळवारी कोरोना साथरोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर बोरगाव पोलीस ठाण्याचे सपोनि डॉ. सागर वाघ यांनी आंदोलनकर्ते, शेतकरी व वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांची बैठक नागठाणे येथील विकास सेवा सोसायटीच्या सभागृहात घेतली. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विकास पवार यांनी वीज वितरणच्या अधिकार्‍यांना अक्षरशः धारेवर धरले.

कोरोनाकाळात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना बेकायदेशीररीत्या दम देऊन वसुली मोहीम राबवून सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. कोरोना काळातही वीज माफीचे आश्‍वासन देऊनही चढ्या दराने बील आकारणी करून नाहक भुर्दंड देण्याचा प्रकार सुरू आहे. लॉकडाऊन काळात सर्व व्यवसाय ठप्प असताना कोणतेही मिटर रीडिंग न घेता औद्योगिक, कृषी, वाणिज्य व घरगुतीची बोगस वाढीव बिले महावितरणकडून ग्राहकांना देण्यात आली आहेत. व त्याची पठाणी पद्धतीने वसुलीची केली जात आहे. वीजबिल भरण्यात सातारा जिल्हा नेहमीच अग्रेसर असतानाही सध्या याच जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर मात्र अन्याय होत आहे. ही पठाणी पद्धतीची वसुली तत्काळ थांबवावी.लॉकडाऊन काळातील सर्व वीजबिल माफ करून सुधारित बिले ग्राहकांना द्यावीत. कृषिपंपाच्या बिलापोटी शेतकर्‍यांना केंद्र व राज्य शासनाकडून महावितरणला आग्रीम देय किती वेळा व किती मिळाले आहे. तरीही शेतकरी अजून लाईट बिलाच्या ओझ्याखाली का आहे? याचा खुलासा व्हावा. जीवनावश्यक असलेल्या ग्रामपंचायत पाणीपुरवठ्याच्या योजनांच्या वीज कनेक्शन तोडू नयेत. या व अशा अनेक मागण्या यावेळी उपस्थित करण्यात आल्या.

यावेळी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाघ, नागठाणे शाखा अभियंता अजय ढगाले यांनी आंदोलकांच्या तीव्र भावना लवकरात लवकर वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत पोहोचणार व वरिष्ठ पातळीवर आंदोलनकर्त्यांची चर्चा घडवून आणण्याचे तसेच जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत कोणतेही वीज कनेक्शन खंडित केले जाणार नसल्याचे आश्‍वासन दिले. यावेळी सपोनि डॉ. सागर वाघ यांनी आक्रोश मोर्चा मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर काही कालावधीसाठी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संचालक यशवंत साळुंखे, मनसे सचिव राजू केंजळे, सातारा शहर प्रमुख राहुल पवार, चेअरमन संजय साळुंखे, मनोहर साळुंखे, नारायण साळुंखे, अ‍ॅड. डी. एस. कुलकर्णी, उपसरपंच अनिल साळुंखे तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.