कोरोना संकटाच्या काळात पाल्याचे शिक्षण चांगल्या प्रकारे सुरु राहण्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. काही पालक शिक्षकांच्या मदतीने पाल्याच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. असेच लोधवडे ता. माण जि. सातारा येथील एका गरीब कुटुंबातील दिव्यांग शिवाजी काशिद आजोबा नातवाच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत.
सातारा : सध्या कोरोना संकटाच्या काळात शाळा बंद पण शिक्षण मात्र सुरू आहे. त्यासाठी शिक्षक ऑनलाईन व्हर्चुअल पध्द्तीने शिक्षणाचे धडे देत आहेत. आजच्या परिस्थितीत आपल्या पाल्याचे शिक्षण चांगल्या प्रकारे सुरु राहण्यासाठी शिक्षकांबरोबर पालकांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. काही पालक शिक्षकांच्या मदतीने पाल्याच्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. असेच लोधवडे ता. माण जि. सातारा येथील एका गरीब कुटुंबातील दिव्यांग शिवाजी काशिद आजोबा नातवाच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. त्यांचे दोन्ही पाय लहानपणापासूनच विकलांग आहेत. त्यामुळे त्यांना साधे चालताही येत नाही. तरी ते बसूनच मेहनतीने पिठाची गिरण चालवून कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना कसलीही शेती व इतर कोणत्याही प्रकारचे आर्थिक मिळकतीचे साधन नाही. या कोरोना महामारीच्या काळात तर त्यांचा व्यवसाय अगदी खूपच मंदावला आहे. आजच्या परिस्थितीत जगणे ही मुश्किल होऊन बसले आहे. असे असतानादेखील आजोबा शिक्षणाचे महत्त्व जाणून असल्याने त्यासाठी ते आपल्या लोधवडे गावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणार्या नातवाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत. गोरक्षनाथ काशिद या त्यांच्या नातवाच्या शिक्षणासाठी त्यांचे धडपडी व हरहुन्नरी शिक्षक सतेशकुमार माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आजोबांचा नातू चांगल्या प्रकारे ऑनलाईन शिक्षण घेत आहे. या दिव्यांग काशिद आजोबांची नातवाच्या शिक्षणासाठी ही तळमळीची धडपड सुरू आहे. शिक्षकांमार्फत सुरू असणार्या मोबाईल गुगल मीट व व्हॉइस कॉन्फरन्सिंगच्या तासिका जोडणी करण्यापासून ते शिक्षकांनी दिलेला स्वाध्यायमालेतील स्वाध्याय पूर्ण करून घेण्याची सर्व कामे ते नातवाकडून करून घेतात. इतकेच काय पण मोबाईलवरून ई-चाचण्या सोडवून घेण्यापासून ते अभ्यास तपासणीसाठी शिक्षकांच्या व्हाट्स अॅव ग्रुपवर पाठवून देणेपर्यंतची ही सर्व नातवाची कामे ते काळजीने वेळेत पूर्ण करीत आहेत.
आजोबांची नातवाच्या शिक्षणासाठीची ही तळमळ आणि धडपड पाहून त्यांच्या नातवाचे वर्गशिक्षक मा. सतेशकुमार माळवे सर व त्यांच्या सौ. सुचिता माळवे मॅडम या शिक्षक दाम्पत्याने त्यांच्या या यशस्वी चिकाटीच्या प्रयत्नाबद्दल त्यांचे घरी जाऊन योग्य असे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून, अशा या शिक्षणप्रेमी दिव्यांग शिवाजी काशिद आजोबांना मानाचा फेटा, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.


