sports

जिल्हावासियांनी लसीकरण करून कोरोनावर मात करावी

आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आवाहन

केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सातारा-जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लस पूर्णपणे सुरक्षित असून, कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्या निकषात बसणार्‍या सर्व जिल्हावासियांनी कोरोनावरील लस घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.  

सातारा : केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. सातारा-जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लस पूर्णपणे सुरक्षित असून, कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्या निकषात बसणार्‍या सर्व जिल्हावासियांनी कोरोनावरील लस घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.  

सोमवारी (दि. 22) दुपारी 12.15च्या सुमारास आ. शिवेंद्रसिंहराजे, वेदांतिकाराजे यांच्यासह जिल्हा रुग्णालयात गेले. त्याठिकाणी दोघांनीही कोरोनावरील लस घेतली. 

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. कारंजकर, डॉ. देवकर, डॉ. दीपक थोरात, डॉ. राजगुरू, डॉ. जाधव, मेट्रन बोबडे, परिचारिका रुबिना शेख, मिरासे आदी उपस्थित होते. 

लस घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षभरापासून सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अजूनही या महामारीची साथ आटोक्यात आलेली नाही. पुन्हा रुग्ण वाढ सुरू झाली आहे. कोरोनापासून स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे अत्यावश्यक आहे. शासनाच्या निकषास पात्र असणार्‍या सर्व नागरिकांनी कोरोनावरील लस घ्यावी आणि कोरोनाचे संकट थोपवण्यास हातभार लावावा.’ 

शासकीय आणि काही खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावरील लसीकरण सुरू करण्यात आले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी लस घेणे काळाची गरज आहे. संपूर्ण लसीकरण झाले तरच कोरोना महामारीला पायबंद घातला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर नेत्यांनी लस घेतली असून, लस घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. लसीबाबत सोशल मीडियावर चुकीचे समज, गैरसमज आणि अफवा पसरवल्या जात आहेत. त्याकडे कोणीही लक्ष न देता लस घ्यावी आणि कोरोनापासून मुक्ती मिळवावी. भारतातील सर्वच लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. शासनाच्या निकषामध्ये बसणार्‍या सातारा जिल्ह्यातील सर्वच नागरिकांनी लस घ्यावी आणि आपला देश कोरोना मुक्त करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.

याशिवाय प्रत्येकाने मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा. वारंवार साबणाने हात धुवावेत तसेच सोशल डिस्टन्िंसगचे काटेकोर पालन करावे. या सर्व बाबी प्रत्येकाला माहिती आहेत. त्यामुळे विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये असे आवाहन करतानाच प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे. अन्यथा मागील दिवस पुन्हा येतील. त्यामुळे लॉकडाऊन सारख्या अप्रिय घटना टाळायच्या असतील तर सर्वांनीच काळजी घ्यावी, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.