sports

विट्याच्या राजा मंडळाकडून कोविड सेंटरला अत्याधुनिक मशीन भेट देणार

मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक अमोल बाबर यांची माहिती

व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन सिलिंडरची जिल्ह्यातील कमतरता पाहता या मशिन्स उपयुक्त ठरतील. म्हणून आम्ही विटा शहरातील दोन्ही कोविड सेंटरला हायफ्लो ऑक्सिजन मशीन देण्याचा संकल्प केला आहे - अमोल बाबर

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता विट्याच्या कोविड सेंटरला हायफ्लो ऑक्सिजन ह्युमीडिफायर मशीन विट्याच्या राजा मंडळाकडून देण्यात येणार आहे. येथील ग्रामीण आणि ओमश्री कोविड रुग्णालयास हे मशीन देण्यात येणार असल्याची माहिती विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक अमोल बाबर यांनी पत्रकार बैठकीत दिली. श्री. बाबर म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची परिस्थिती पाहता जिल्ह्यात आणि खानापूर तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहेत. या रुग्णांना श्वसनाचा त्रास होतो, ऑक्सिजनची कमतरता जाणवते त्यामुळे अनेक रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर किंवा व्हेंटिलेटरची सर्रास मागणी केली जाते. संबंधित रुग्णांमध्ये ६०-६५ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजनची मात्रा असेल तर अशा रुग्णांसाठी हायफ्लो ऑक्सिजन ह्युमीडिफायर मशीन चांगले काम करते. व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजन सिलिंडरची जिल्ह्यातील कमतरता पाहता या मशिन्स उपयुक्त ठरतील. म्हणून आम्ही विटा शहरातील दोन्ही कोविड सेंटरला हायफ्लो ऑक्सिजन मशीन देण्याचा संकल्प केला आहे. एका आठवड्यात आम्ही हे ऑक्सिजन मशीन देणार आहोत. विटा ग्रामीण रुग्णालय आणि मायणी रस्त्यालगतच्या कोविड रुग्णालयाला हे मशीन देण्यात येणार आहे. याचा फायदा लोकांना होईल, यापुढील काळातही विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाच्यावतीने मदत करणार असल्याचे श्री. बाबर यांनी सांगितले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, मंडळाचे उपाध्यक्ष अभिजित पवार, सौरभ रोकडे उपस्थित होते.