वनविभागाकडून गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची पाठराखण?
तक्रारदार ओंकार शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू : तडजोड न केल्यानेच आठ दिवसानंतर वनविभाग ऍक्टिव्ह ?
शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २५ हजार उकळणाऱ्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह अज्ञात दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पिरेवाडीच्या युवकावरच आता वनविभाग गुन्हा दाखल करण्याचा तयारीत आहे. आठ दिवस उलटल्यानंतर वन विभागाला जाग कशी आली असा प्रश्न उपस्थित होत आहे
नागठाणे : शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत २५ हजार उकळणाऱ्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह अज्ञात दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या पिरेवाडी (भैरवगड) ता.सातारा येथील ओंकार शामराव शिंदे युवकाविरुद्ध आठ दिवस उलटल्यानंतर वनविभाग गुन्हा दाखल करण्याचा तयारीला लागली आहे.
ओंकार शिंदे याने वनकर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्याना तडजोडीत अपयश आल्याने अखेर आपल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारीच सरसावले आहे. मात्र त्याच्याविरुद्ध कोणता गुन्हा वनविभाग दाखल करणार? याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.
३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी स्वतःच्या मालकीच्या शिवारातील पिकांचे माकडांपासून नुकसान होऊ नये म्हणून पिरेवाडी येथील युवक ओंकार शिंदे गेला असता त्याला वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले व अज्ञात दोघांनी पकडले होते. यावेळी त्यांनी त्याला अनेक ठिकाणी फिरवून मारहाण करत त्याच्या कोऱ्या कागदावर सह्या घेत गुन्हा दाखल करण्याची व करिअर खराब करण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केली होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या कुटुंबियांकडून २५ हजार रुपये या वनकर्मचाऱ्यांनी घेतले होते.
या घटनेची तक्रार त्याने सातारा वनविभाग व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली होती. हे प्रकरण बोरगाव पोलिसांकडे तपासासाठी देण्यात आले होते. तक्रारीची दखल घेत सपोनि डॉ.सागर वाघ यांनी वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले व अज्ञात दोघांविरोधात शनिवारी रात्री उशिरा खंडणीचा गुन्हा दाखल केला होता.
डिपार्टमेंटला व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होत असल्याचे समजल्यावर अनेकांनी युवकाने पोलिसात तक्रार देऊ नये व वनविभागातील तक्रार अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. वनविभागातील काही अधिकाऱ्यांसह पिरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाचाही सहभाग असल्याचे समजते. मात्र ओंकार शिंदे याने शनिवारी रात्री पोलिसांत गुन्हा दाखल केल्याने संशयित तेव्हापासून बेपत्ता झाले.
मंगळवारी वनविभागाकडून ओंकार शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा हालचाली सुरू झाल्या. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ओंकार शिंदे विरुद्ध कोणता गुन्हा दाखल करणार याची माहिती देता येत नसल्याचे सांगितले. एवढ्या उशिरा गुन्हा दाखल करण्यामागचे कारणही सांगण्यास नकार दिला.
घटना घडून आठ दिवस उलटून गेल्यावर वनविभाग अचानक ऍक्टिव्ह कसा झाला? इतरवेळी केलेल्या कारवाईंची माहिती लगेच प्रेसनोट देऊन माध्यमांपर्यंत पोहचविण्याची धडपड करणारे वनविभागाचे अधिकारी आठ दिवस नेमके काय करत होते? वनकर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तडजोडीसाठी पळणारे अधिकारी व शिक्षक नेमके कोण? ओंकार शिंदे याने तडजोड केली नाही म्हणूनच खंडणीच्या गुन्ह्यात अटकलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी वनविभाग आता त्याच्याविरुद्ध सूडबुद्धीने गुन्हा दाखल करत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले आहेत.


