नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारतात संशोधन मोठ्या प्रमाणात होईल
डॉ. जगन्नाथ डांगे यांचे मत; छ. शिवाजी कॉलेजमध्ये राष्ट्रीय वेबिनार संपन्न
‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत संस्थांची चलती आणि बाजारूपणा बोकाळला आहे. ज्ञानाच्या आधारावर नोकरी मिळवण्याची संकल्पना विद्यार्थ्यांच्या डोक्यातून पुसट होत आहे. नोकरी योग्य कौशल्य नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात आता आंतरविद्याशाखीय पदवी घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुढील काळात रोजगार मिळण्यासाठी आंतरविद्याशाखीय पदवी आणि संशोधन काम हे उपयोगी ठरेल.
सातारा : ‘सध्याच्या शिक्षण पद्धतीत संस्थांची चलती आणि बाजारूपणा बोकाळला आहे. ज्ञानाच्या आधारावर नोकरी मिळवण्याची संकल्पना विद्यार्थ्यांच्या डोक्यातून पुसट होत आहे. नोकरी योग्य कौशल्य नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात आता आंतरविद्याशाखीय पदवी घेण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पुढील काळात रोजगार मिळण्यासाठी आंतरविद्याशाखीय पदवी आणि संशोधन काम हे उपयोगी ठरेल. परिणामी, नव्या शैक्षणिक धोरणामुळे परदेशाप्रमाणे भारतात संशोधन मोठ्या प्रमाणात होईल,’ असे मत कुवेम्पू विद्यापीठ कर्नाटक येथील डॉ. जगन्नाथ डांगे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या छ. शिवाजी कॉलेज सातारा व बळवंत कॉलेज विटा येथील शिक्षणशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांनी आयोजित केलेल्या ‘नवे शैक्षणिक धोरण 2020 आणि उच्च शिक्षण’ या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये ते बोलत होते.
नव्या शैक्षणिक धोरणामुळे देशाची प्रगती होईल. येत्या काही वर्षांत आपली विद्यापीठे परदेशी विद्यापीठाची बरोबरी करत आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये स्थान मिळवतील. आवडीच्या विषयात पदवी व नोकरी कौशल्याचा विकास आणि खिशाला परवडेल अशा दरात सुविधा मिळतील, असा विश्वासही डॉ. डांगे यांनी व्यक्त केला.
दुसर्या सत्रात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे अधिष्ठाता व केसीइएस कॉलेज ऑफ एज्युकेशन जळगावचे प्राचार्य डॉ. अशोक राणे म्हणाले, ‘अभ्यासक्रम शिकवण्याची पद्धत, परीक्षांचे विकेंद्रीकरण, तासिका आणि परीक्षा विभाग यात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. आधुनिक काळात शैक्षणिक तंत्रज्ञान वापर आवश्यक असून, विद्यार्थ्यांना हे आव्हान पेलावे लागेल. तसेच कौशल्य विकासावर भर द्यावा लागेल.’
रयत शिक्षण संस्थेचे सचिव व छ. शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारच्या प्रारंभी शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान विभागाचे माजी अधिष्ठाता बळवंत कॉलेज विटाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी वेबिनारचे उद्घाटन केले.
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. अनिल वावरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. सुरेश झोडगे आणि प्रा. सुधाकर कोळी यांनी तांत्रिक सहकार्य केले. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. अनिसा मुजावर यांनी मार्गदर्शन केले.
या वेबिनारमध्ये भारतातील विविध विद्यापीठे, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आदी सहभागी झाले होते.
छ. शिवाजी कॉलेजच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख व वेबिनार समन्वयक डॉ. वर्षा माने यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. डॉ. सीमा मर्जे यांनी आभार मानले.


