राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या आणि चार नगपंचायतींच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुका पुढच्या महिन्यात भर पावसात नियोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी सर्वपक्षीय मागणी होती.
मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा गुन्हा भाजपचे माण-खटावचे आ. जयकुमार गोरे यांच्यावर दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीनासाठी आ. गोरेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. बुधवारी त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने त्यांना शरण येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांना चार आठवडे अटकेपासून दिलासाही दिला आहे.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाढे फाट्यावर कंटेनरने एसटीला धडक दिल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने एसटीतील प्रवाशांना कोणतीही जखम झाली नाही. हा अपघात १२ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कंटेनरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
आसु, ता. फलटण येथे विहिरीत पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
राजाळे, ता. फलटण येथे विजेचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
रंगनाथ स्वामींची निगडी, ता. सातारा येथून एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार रहिमतपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
ठोसेघर, ता. सातारा येथे सुरू असणाऱ्या दारू अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ३ हजार ६०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
चाफळ येथील प्रसिद्ध असलेल्या श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न झाला. यावेळी समर्थ सभागृहामध्ये समर्थ वंशज भूषण स्वामी महाराज यांच्याकडून गुरु मंत्र देण्यात आला.
वीज वितरण कंपनीने महाराष्ट्रात इंधन अधिभार 20 टक्के वाढवल्याने आम आदमी पार्टीने याचा निषेध म्हणून सातार्यात बुधवारी कंदील आंदोलन केले. तसेच यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले.
चेन्नई येथे पार पडलेल्या पाचव्या युथ मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा जिल्हा आणि राजधानी स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू आर्या देवेंद्र बारटक्के हिने 54 ते 57 किलो वजनी गटामध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक घेऊन सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेतले पहिले सुवर्णपदक मिळवून देण्याचा मान मिळवला.