वीज वितरण कंपनीने महाराष्ट्रात इंधन अधिभार 20 टक्के वाढवल्याने आम आदमी पार्टीने याचा निषेध म्हणून सातार्यात बुधवारी कंदील आंदोलन केले. तसेच यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले.
सातारा : वीज वितरण कंपनीने महाराष्ट्रात इंधन अधिभार 20 टक्के वाढवल्याने आम आदमी पार्टीने याचा निषेध म्हणून सातार्यात बुधवारी कंदील आंदोलन केले. तसेच यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले.
आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर आणि जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांमध्ये जिल्हा सचिव मारुती जानकर, प्रसिद्धीप्रमुख निवृत्ती शिंदे, जिल्हा संघटक रतन पाटील, गुलाब बनसोडे, जयराज मोरे, एडवोकेट मंगेश महामूलकर इत्यादी सहभागी झाले होते.
आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात कंदील घेऊन राज्य शासनाचा निषेध केला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव म्हणाले, झालेली दरवाढ ही अन्यायकारक असून आम्ही आम आदमी पक्षाच्यावतीने याचा निषेध करतो. हे सरकार भांडवलशाही सरकारचे सरकार आहे. विज वितरण कंपनीचे कॅग मार्फत ऑडिट करण्यात यावे. जनतेला वीज दरवाढीमध्ये सूट देवून जनतेला हे जनतेचे सरकार असल्याचे नवनियुक्त सरकारने दाखवून द्यावे.
पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर म्हणाले, इंग्रज राजवटीत ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ज्याप्रमाणे जनतेची पिळवणूक करीत होती. त्याचप्रमाणे राज्यातील नवनियुक्त सरकार महावितरण च्या माध्यमातून जनतेची पिळवणूक करीत आहे. काही दिवसांपूर्वीच डिपॉझिटच्या नावाखाली हजारो रुपये जमा करुन घेवून सामान्य जनतेला महावितरण ने नाडले आहे. आता तर महावितरण ने 20 ते 30 टक्के दरवाढ करुन महागाईत होरपळणार्या जनतेला उपाशी मारायचाच विडा उचलला आहे. महावितरण ही कंपनी सरकारच्या अखत्यारित असताना सरकारची या वीज दरवाढीला मूक संमतीच असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली आणि पंजाब मध्ये आम आदमी पार्टीची सत्ता आहे. या दोन्ही राज्यात 200 युनिट वीज मोफत देण्यात येते, तर पुढील प्रत्येकी 100 युनिटला निम्माच अधिभार लावला जात आहे. जर पंजाब व दिल्लीमध्ये असे घडू शकते तर महाराष्ट्रातील सरकार ही योजना का राबवित नाही?
निवेदनात नमूद आहे की, राज्यातील सरकार हे सामान्य जनतेचा विचार न करता केवळ नफेखोरी च्या दृष्टिकोनातून भरमसाठ पद्धतीने वस्तू व सेवांवरील कर वाढवत आहे. त्याची जनतेला मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. महाराष्ट्रात सत्तेवर आलेला नवनियुक्त सरकारने जनतेला विजेच्या दरात वीस टक्के तसेच घरगुती गॅसच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करून एक झटका दिला आहे. या गोष्टींचा आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. जर वीज दरवाढ रोखली गेली नाही तर लोकशाही मार्गाने लोकांना बरोबर घेवून आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही सरकारची राहील. यावेळी आम आदमी पार्टीच्या आंदोलकांनी भर पावसात कंदील पेटवून रस्त्याने चालत जाऊन निषेध केला.


