गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, भारताने 'रत्न' गमावले!
केंद्र सरकारने घोषित केला दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे.
मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज मुंबईत निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशातून शोक व्यक्त होत आहे. केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. ऐ मेरे वतन के लोगों..., मेरी आवाज ही पहचान है गर याद रहे... अशी अनेक अजरामर गाणी गाणाऱ्या लतादीदींच्या निधनावर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला.
गेल्या सात दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतामुळं तृप्त होणारं प्रत्येक मन खंतावलं आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालजयी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशी भावना जगभरातून व्यक्त होत आहे.
९२ वर्षीय लतादीदींना यांना काही दिवसांपूर्वी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोना व न्यूमोनियाची लागण झाल्याचं तपासणीनंतर समोर आलं होतं. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. प्रकृती सुधारल्यामुळं त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणाही काढण्यात आली होती. मात्र, वय जास्त असल्यानं खबरदारी म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. कालपासून पुन्हा त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे. लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. लतादीदींच्या स्मृतीत दोन दिवस राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लतादीदींचा २००१ मध्ये देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'भारतरत्न पुरस्कारा'ने सन्मान करण्यात आला होता. तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांनी भारतरत्न पुरस्काराने प्रदान करून लतादीदींचा सन्मान केला होता.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर या कायम स्मरणात राहतील. लता दीदींचे कर्तृत्व अतुलनीय आहे, अशा भावना राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान मोदींनी लतादीदींच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'लतादीदींच्या निधनाने मोठे दुःख झाले आहे. लतादीदींच्या निधनाने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे', अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. लतादीदींचे निधनाने खूप दुःखी झालो आहे. आपल्याकडे शब्दच नाहीत. भारतीय संगीत क्षेत्रात लतादीदींचे मोठे योगदान आहे. माझ्यासाठी त्यांचे निधन हे वैयक्तीकरित्या झालेले मोठे नुकसान आहे, अशी भावना अमित शहांनी ट्विट करून व्यक्त केली आहे.
असा सुरू झाला गायन प्रवास
लतादीदींनी वयाच्या १३ व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. १९४२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली. 'एक प्यार का नगमा है', 'राम तेरी गंगा मैली', 'एक राधा एक मीरा' आणि 'दीदी तेरा देवर दीवाना' यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना लता मंगेशकर यांनी स्वरसाज चढविला होता.
लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये पद्मभूषण, १९९९ मध्ये पद्मविभूषण आणि २००१ मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना २००९ मध्ये 'ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.