cineworld

वाठार स्टेशनच्या वाग्देव चौकात कोरोना तपासणी

महसूल व पोलिस, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा उपक्रम

पिंपोडे बुद्रुक,  ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाने वाठार स्टेशन येथील वाग्देव चौकात कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. महसूल व पोलिस प्रशासनाच्या, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने येणार्‍या जाणार्‍या लोकांच्या रॅपिड टेस्ट करण्यात आल्या.
सविस्तर माहिती अशी, उत्तर कोरेगावातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे वाठार स्टेशन असून या ठिकाणी बँका पतसंस्था महावितरणचे प्रमुख ऑफिस पोस्ट ऑफिस तसेच प्रशासकीय कार्यालये आहेत. वाठार परिसरातील लोक कामानिमित्त भरपूर प्रमाणात येत असतात. प्रशासनाने अत्यावश्यक सेवेसाठी ठरवून दिलेल्या वेळेत आपली महत्वाची कामे करण्यासाठी पर गावातून मोठ्या संख्येने लोक ठीक ठिकाणी प्रशासकीय कार्यालयात, महावितरण कार्यालयात, तसेच बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. सहाजिकच या होणार्‍या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी कोरेगाव तालुक्याच्या प्रांत अधिकारी ज्योती पाटील व तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि स्वप्निल घोंगडे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल पाटील व त्यांचा सर्व स्टाफ तसेच महसूल कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाठार स्टेशन मध्ये येणार्‍या-जाणार्‍या लोकांची कोरोना रॅपिड व आरटीपीसीआर चाचणी केली. यामध्ये एकूण 153 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 70 लोकांची रॅपिड टेस्ट केली असता सर्वच्या सर्व निगेटिव्ह आले. तसेच 83 लोकांची आरटीपीसीआर तपासणी केली असून सदर रिपोर्ट उद्या पर्यंत मिळणार आहे. या आजच्या कॅम्पला महसूल प्रशासन, प्राथमिक आरोग्य अधिकारी, व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी मंडलाधिकारी प्रशांत डोईफोडे, झोनल अधिकारी यशेंद्र क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी स्नेहल पाटील, विस्ताराधिकारी जगताप साहेब, तलाठी नामदेव नाळे, ग्रामसेवक ढोबळे अण्णा, तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते.