जनतेचा जीवासाठी माण पंचायत समितीचा धाडसी निर्णय
पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी देणार 20 लाख रुपये
माण तालुक्यात कोविड आजाराने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.
दहिवडी : माण तालुक्यात कोविड आजाराने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोविड विरुद्धच्या लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले.
माण तालुक्यात सध्या साधारण दीड हजार कोरोनाबाधित आहेत. पण त्यामानाने तालुक्यात आरोग्य सुविधांची वानवा आहे. उणेपुरे चार व्हेंटिलेटर अन् सत्तावन्न ऑक्सिजन बेड तालुक्यात आहेत. तर कोविड सेंटरमध्ये सुद्धा विलगीकरण बेडची संख्या सुद्धा पाहिजे तितकी नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना इतर तालुक्यात, शहरात अथवा जिल्ह्यात उपचारासाठी भटकावे लागते. तर कोविड सेंटरमध्ये योग्य सुविधा वा जागा उपलब्ध नसल्याने अनेकजण घरीच अलगीकरणात राहत आहेत. अनेक रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅबिफ्ल्यू या गोळ्या मिळत नाहीत. तर ऑक्सिजन अभावी कित्येकजण तडफडत असून काहींना प्राण गमवावे लागले आहेत. तालुक्यातील नेतेमंडळी तसेच सामाजिक संस्थांनी कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. परंतु, अजूनही मदतीची आवश्यकता आहे.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन माण पंचायत समितीचे प्रभारी सभापती तानाजी कट्टे-पाटील व त्यांचे सहकारी रमेश पाटोळे, कविता जगदाळे, नितीन राजगे, विजयकुमार मगर, तानाजी काटकर, लतिका वीरकर, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्रभागा आटपाडकर यांनी कोविड विरुद्धच्या लढ्याला बळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक सदस्याचे दोन लाख असे एकूण वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी मार्गदर्शन केले.
माणमधील दीड हजार रुग्णांपैकी साधारण एक हजार कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. त्यातील बहुतांशी कोरोनाबाधित गरीब आहेत. त्यांना वैद्यकीय सल्ल्याने फॅबी फ्ल्यू गोळ्या दिल्या तर ते लवकर बरे होऊ शकतील, असा सल्ला त्यांनी दिला. सध्या माणमध्ये कशाची गरज आहे व उपचार पद्धती कशी असावी, हेही त्यांनी समजावून सांगितले. त्यानंतर गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्या सल्ल्याने सदर रक्कम खर्च करण्याचे सुचित केले.
त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 लाख रुपये फॅबी फ्ल्यू गोळ्यांसाठी, 5.5 लाख रुपये ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी, 2 लाख रुपये जम्बो सिलिंडरसाठी तर 1 लाख रुपये जनजागृतीसाठी वापरण्याचे निश्चित करण्यात आले. उर्वरित रक्कमही आवश्यक असेल तशी वापरण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच पुढील कालावधीत लागली तर अजून रक्कम कोरोनाबाधितांसाठी देण्यात येईल, असे सांगण्यात आले. पंचायत समिती सदस्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले असून त्यांचे अनुकरण करून ग्रामपंचायत, सोसायटी, कंपन्या, मोठे व्यावसायिक, सामाजिक संस्था यांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
माणची जनता कोरोनाच्या भयंकर संकटात सापडली आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या विशेषत: आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. कोविड विरुद्धच्या लढ्यात माण पंचायत समिती जनतेसोबत खंबीरपणे उभी आहे.
- तानाजी कट्टे-पाटील, प्रभारी सभापती, माण पंचायत समिती