sports

कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन

गोरेगावच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा निवेदनाद्वारे इशारा

गोरेगाव (निमसोड) ता. खटाव येथील कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीकरिता गावातील प्रमुख कार्यकर्ते शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी वडूज येथील तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.

निमसोड : गोरेगाव (निमसोड) ता. खटाव येथील कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीकरिता गावातील प्रमुख कार्यकर्ते शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी वडूज येथील तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.
याबाबत नागरिकांनी दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी, गोरेगाव येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकार्‍यांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना हाताशी धरून कृषी खाते तसेच बांधकाम खात्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. कृषी विभागाने गरजू लाभार्थ्यांना डावलून सक्षम लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिला आहे. या लोकांनी शासकीय अनुदानातून मिळालेल्या साहित्याची परस्पर विक्री केली आहे. सरपंच पाणलोटचे अध्यक्ष असताना त्यांनी स्वत:ची वाहने वापरून अंतर्गत पाईपलाईन व इतर कामात लाभ घेतला आहे. तसेच सरपंचांनी अंबवडे-गोरेगाव रस्त्याच्या कामासाठी पदाचा गैरवापर करून वनविभागाच्या हद्दीतील मुरमाची ठेकेदारास बेकायदेशीर विक्री केली आहे. याशिवाय चौदाव्या वित्त आयोगातील निधीतून मोठ्या प्रमाणावर बोगस कामे करून निधी लाटण्याचा प्रयत्न केला आहे, असेही शेवटी निवेदनात नमूद केले आहे.  
निवेदनावर विक्रमराज डोईफोडे, विठ्ठल नलवडे, धैर्यशील डोईफोडे, शिवाजी डोईफोडे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.