sports

भुईंज महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने प्रवासी व्यक्तीला मिळाले जीवदान

महामार्ग पोलिसांच्या कर्तव्यतत्परतेचे सामाजिक स्तरातून कौतुक

खंबाटकी घाटामध्ये आपले कर्तव्य बजावणार्‍या आणि महामार्गावर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी गस्त घालणार्‍या भुईंज येथील महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटक राज्य एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्‍या एका प्रवासी व्यक्तीला गंभीर स्थितीत असताना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे त्या प्रवासी व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत झाली. महामार्ग पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

सातारा : खंबाटकी घाटामध्ये आपले कर्तव्य बजावणार्‍या आणि महामार्गावर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी गस्त घालणार्‍या भुईंज येथील महामार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे कर्नाटक राज्य एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्‍या एका प्रवासी व्यक्तीला गंभीर स्थितीत असताना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिल्यामुळे त्या प्रवासी व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत झाली. महामार्ग पोलिसांच्या या कर्तव्यतत्परतेचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुईंज येथील महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे आपले कर्तव्य बजावत असताना आणि महामार्गावर वाहतुकीचे नियमन करत गस्त घालत असताना त्यांची गाडी खंबाटकी घाटात आली होती. त्याच वेळी कर्नाटक राज्य एसटी महामंडळाची बस पुण्याहून सातार्‍याकडे खंबाटकी घाटात घाट चढत होती. अचानक बसमधील एका प्रवाशाला रक्ताच्या उलट्या होऊन नाकातोंडातून रक्त येऊ लागले आणि ती व्यक्ती बेशुद्ध पडली. त्यामुळे बस चालक व वाहक आणि बसमधील सर्व प्रवासी अचानक झालेल्या या घटनेमुळे घाबरले. 

मात्र, त्याच वेळी चालकाला महामार्ग पोलिसांची गस्त घालणारी गाडी दिसल्यानंतर त्या बसचालकाने आपली बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेऊन पोलिसांना या घटनेची माहिती दिली व बेशुद्ध पडलेल्या प्रवाशांना तातडीने औषधोपचार करण्यासाठी दवाखान्यात नेण्याची विनंती केली. भुईंज येथील महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस कर्मचारी सहायक फौजदार जाधव, पोलीस हवालदार माने, पोलीस नाईक दीपक गुरव, पोलीस हवालदार कचरे आणि पोलीस शिपाई जटाप्पा लोणार यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने सदर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रवासी व्यक्तीला पोलीस व्हॅनमधून खंडाळा येथील शासकीय रुग्णालयामध्ये तातडीने दाखल केले. त्या रुग्णालयातून वैद्यकीय अधिकार्‍यांना सदरच्या बेशुद्धावस्थेतील प्रवासी व्यक्तीवर तातडीने योग्य ते औषधोपचार करण्याची विनंतीही महामार्ग पोलीस कर्मचार्‍यांनी केली. सदर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने बेशुद्धावस्थेतील त्या प्रवासी व्यक्तीवर औषधोपचार केल्यामुळे थोड्या वेळानंतर ती व्यक्ती शुद्धीवर आली. महामार्ग पोलीस कर्मचार्‍यांनी दाखवलेल्या सयमसुचकतेमुळे आणि वैद्यकीय अधिकार्‍यांनी तातडीने केलेल्या योग्य औषधोपचारामुळे सदर बेशुद्ध प्रवाशी व्यक्तीचे प्राण वाचण्यास मदत झाली होती.

सदर व्यक्तीला थोड्यावेळाने थोडेफार बरे वाटू लागल्यानंतर महामार्ग पोलिसांनी त्या व्यक्तीचे नाव व गाव विचारले असता सदर व्यक्तीचे नाव भालचंद्र अनंत जाधव (वय 47, रा. फलटण) असल्याचे समजले. त्यानंतर महामार्ग पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या घरी फोन करून त्यांच्या पत्नी नेहा जाधव यांना घडलेल्या घटनेबद्दल सविस्तर माहिती देऊन घाबरून न जाता खंडाळा येथील शासकीय रुग्णालयामध्ये येण्यास सांगितले.

अशा प्रकारे भुईंज येथील महामार्ग पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत असताना एका गंबीर अवस्थेत असलेल्या प्रवासी व्यक्तीवर तातडीने उपचार करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल महामार्ग पोलिसांना समाजाच्या सर्व स्तरातून धन्यवाद देण्यात येत असून, त्यांनी दाखविलेल्या माणुसकीबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.