sports

शिक्षकांनी अध्यापनात नवनिर्मिती करुन ज्ञानदान करावे

माजी प्राचार्य प्रकाश पाटील यांचे प्रतिपादन

टेंभु आणि आचरेवाडी विद्यालयांच्या प्रगतीसाठी मी नेहमी प्रयत्नशील असून आधुनिक शिक्षण देण्यासाठी सर्व सुविधा शाळेत निर्माण केल्या आहेत. आपण काम करण्यास कमी पडू नका आपणास सुविधा देण्यास मी कमी पडणार नाही. - माजी प्राचार्य प्रकाश पाटील
ढेबेवाडी : रणजित डीसले यांनी जागतिक ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळवला ही आपल्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट असून आपण याच धर्तीवर जास्तीतजास्त डिजिटल क्लासरूमचा वापर करुन नेहमी प्रयोगशील राहावे. अध्यापनात नवनिर्मिती करुन आपणही आपल्या विद्यार्थ्यांना सक्षम ज्ञानदान करावे असे प्रतिपादन माजी प्राचार्य प्रकाश पाटील यांनी केले.
टेंभु ता. कराड येथे गोपाळ गणेश आगरकर विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आचरेवाडी ता.पाटण विद्यालयातील सर्व शिक्षकांची कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी आगरकर संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, विधावर्धिनी शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा माजी प्राचार्या उज्वला पाटील, मुख्याध्यापक फैय्याज संदे, प्राचार्य बबन साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रकाश पाटील पुढे म्हणाले, टेंभु आणि आचरेवाडी विद्यालयांच्या प्रगतीसाठी मी नेहमी प्रयत्नशील असून आधुनिक शिक्षण देण्यासाठी सर्व सुविधा शाळेत निर्माण केल्या आहेत. आपण काम करण्यास कमी पडू नका आपणास सुविधा देण्यास मी कमी पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उज्वला पाटील म्हणाल्या, शिक्षकांनी नेहमी नव्या बदलासाठी तत्पर राहावे. आपली शाळा व विद्यार्थी गुणवत्तापूर्ण झाला पाहिजे यासाठी चांगले काम करावे. आपण आपल्या कामाने आपल्यातील उठावदारपणा दाखवला पाहिजे असे पाटील म्हणाल्या.
यावेळी बबन साबळे, पी. एम. यादव, संजय लोहार, थोरात सर, शिंदे सर, नागरगोजे सर, यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली. मुख्याध्यापक संदे सर यांनी प्रास्ताविक केले. नागरगोजे सर यांनी आभार मानले.