sports

महिला वर्गाने स्वसंरक्षणाचे धडे घ्यावेत

जान्हवी पाटील : महिला कॉलेजमध्ये महिला सक्षमीकरण व स्वसंरक्षणावर कार्यशाळा संपन्न

‘महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे, ही काळाची गरज असून संघर्षाच्या क्षणी आपण स्वावलंबी असले पाहिजे,’ असे प्रतिपादन रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार जान्हवी पाटील यांनी केले. 

सातारा : ‘महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे घेणे, ही काळाची गरज असून संघर्षाच्या क्षणी आपण स्वावलंबी असले पाहिजे,’ असे प्रतिपादन रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व पत्रकार जान्हवी पाटील यांनी केले. 

येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात महिला विकास मंच व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरण व स्वसंरक्षण विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते. 

महाविद्यालयाच्या महिला विकास मंचच्या चेअरमन व उपप्राचार्य डॉ. सुनीता घार्गे, अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या चेअरमन प्रा. सुरेखा शिंदे व पत्रकार गौरी आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

दोन सत्रात घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत प्रथम सत्रात जान्हवी पाटील व प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. तर द्वितीय सत्रात प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षण कसे करावे यासंबंधी प्रशिक्षित करण्यात आले. आपल्या जवळ उपलब्ध असणार्‍या पर्स, कॉलेज बॅग, हातातील जड बांगड्या ही साधने संकट काळात स्वसंरक्षणासाठी कशी वापरावी, यासंबंधी अनेक क्लृप्त्या यावेळी दाखवण्यात आल्या.

उपप्राचार्या डॉ. सुनीता घार्गे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुरेखा शिंदे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. मंदाकिनी वर्णेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दिलीप पवार यांनी आभार मानले.